'स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांकडे लक्ष द्या'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 h ago
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

पश्चिम बंगालमधील वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावरून बांगलादेशने भारतावर टीका केल्यानंतर भारताने कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी भारतात मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा केला. त्यांनी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारने अल्पसंख्याक मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी बांगलादेशला खडे बोल सुनावले. "बांगलादेशने भारताला उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांकडे लक्ष द्यावे," असे सांगितले. 

काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालमध्ये वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात मुस्लिम संघटनांनी आंदोलन केले. यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांवर बांगलादेशने भारताच्या अंतर्गत बाबींवर टीका करत मुस्लिमांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. भारताने ही टीका स्पष्टपणे फेटाळली असून, बांगलादेशचा हा दावा खोटा आणि भारताने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारांबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची नक्कल असल्याचे म्हटले आहे. जैस्वाल यांनी बांगलादेशातील सत्तांतरानंतर तिथल्या अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांवर झालेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले. "बांगलादेशमध्ये अशा घटनांचे गुन्हेगार मोकळेपणाने फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भारतावर आधारहीन आरोप केले जात आहेत," असे ते म्हणाले.

भारताची भूमिका स्पष्ट
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “भारत हा सर्वधर्मसमभावाचा देश आहे आणि येथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. उलट, बांगलादेशने स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले, मंदिरांवरील हल्ले आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याची टीका आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter