भारताची फाळणी झाल्यापासून ते नंतरच्या वीस वर्षांमधील छायाचित्रे, छापून आलेल्या बातम्या आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटायझेशन केले जाणार असून ब्रिटनमधील कॉव्हेन्ट्री विद्यापीठाने या संशोधन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.
फाळणी आणि त्यानंतरच्या अनेक घटनांची छायाचित्रे आणि कागदपत्रांचा मुंबईतील हॅमिल्टन स्टुडिओमध्ये संग्रह आहे. या संग्रहामध्ये भारतीय इतिहासातील शंभर वर्षांच्या कालखंडाशी निगडित कागदपत्रे असून एकूण सुमारे सहा लाख घटकवस्तू यात सामील आहेत. प्रकल्पाचा मुख्य भर १९४७ ते १९६७ या काळातील घटनांचा वेध घेणाऱ्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यावर असणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या विद्यापीठाने स्थानिक पातळीवरील ७० हजार छायाचित्रे, व्हिडिओ आणि कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले आहे. यात चांगले यश मिळाल्यानेच त्यांनी हा नवा प्रकल्प हाती घेतला आहे.
इतिहासातील सांस्कृतिक घटना जतन करून ठेवण्याची क्षमता डिजिटल तंत्रज्ञानात असून भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे या प्रकल्पाचे प्रमुख बेन काइन्सवूड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
असा असेल प्रकल्प
मुंबईतील हॅमिल्टन स्टुडिओ आणि अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन यांच्या सहकार्याने कॉव्हेन्ट्री विद्यापीठ हा प्रकल्प राबविणार आहे. फाळणीशी संबंधित कागदपत्रे, बातम्या, छायाचित्रे यांचे डिजिटायझेन केले जाणार आहे. अनेक छायाचित्रांच्या निगेटिव्हवरून छायाचित्रे तयार केली जाणार आहेत. शिवाय, अनेक कायदेशीर कागदपत्रांमधून नवी माहितीही समोर येण्याची शक्यता आहे. त्याकाळी छापून आलेल्या जाहीरातींवरून तेव्हाची व्यवसायाची धोरणे आणि ग्राहकांची रुची यावरही प्रकाश पाडता येणार आहे.