उत्तर गाझात आपल्या घरी परतले हजारो पॅलेस्टिनी!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्रायल आणि हमास यांच्यात करार पूर्ण झाल्यानंतर उत्तर गाझातील आपल्या घरी हजारो पॅलेस्टिनी परतले आहेत. याआधी इस्रायलने हमासवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हजारो पॅलेस्टिनींचे आपल्या घरी परतणे रखडले होते. परंतु पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने रविवारी रात्री सांगितले की, हमाससोबत एक नवीन करार झाला आहे. आता हा करार पूर्ण झाल्यानंतर आता हे लोक आपल्या घरी परतताना दिसत आहेत.

अशा प्रकारे, सोमवारी पहाटे गाझा शहरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग उघडले गेले आहेत. पहिला मार्ग मध्य गाझामध्ये सकाळी ७ वाजता (GMT 0500) उघडला आणि दुसरा मार्ग ९ वाजता उघडला गेला आहे. दोन्ही मार्ग उघडल्यावर, हजारो गाझा रहिवासी त्यांचे सामान घेऊन उत्तरेकडे जात होते, तसेच इस्रायली सैन्याकडून गाझा नागरिकांना सूचना देण्यात की त्यांनी सैन्याच्या स्थानांकडे जाण्याचा प्रयत्न करू नये.

१९ जानेवारीपासून युद्धविराम करार सुरू
युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा १९ जानेवारीपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात गाझामध्ये १९ जानेवारी ते १ मार्च या कालावधीत युद्धविराम असेल. या टप्प्यात हमास ३३ इस्रायली ओलीस सोडणार आहे. त्या बदल्यात डझनभर पॅलेस्टिनींना सोडले जाईल. एका इस्रायली ओलीसाच्या बदल्यात ३३ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडावे लागेल. त्याच वेळी, प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागे ५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल.

१५ महिन्यांसाठी युद्धविराम
इस्रायल आणि हमास यांच्यातील सहा आठवड्यांची युद्धविराम सहाव्या दिवसात दाखल झाली आहे. युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी, ९० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात पहिल्या तीन इस्रायली ओलीसांची सुटका करण्यात आली. या युद्धबंदीमुळे गाझामध्ये १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध सध्या थांबले आहे. गाझामधील १५ महिन्यांच्या युद्धात ४७,००० हून अधिक लोक मारले गेले तर हजारो जखमी झाले.