पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींचा हमासवर हल्लाबोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास
पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास

 

पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी हमासवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हमासला 'कुत्र्याची पिल्ले' असे संबोधले. हमासने शस्त्रे खाली ठेवावीत आणि इस्रायली ओलिसांना सोडावे, अशी मागणी  महमूद अब्बास यांनी केली आहे. गाझा पट्टीत इस्रायलकडून होणारा नरसंहार थांबवणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. ओलिसांचे निमित्त पुढे करून इस्रायलला गाझावर हल्ले करण्याचे कारण मिळाले असे त्यांनी म्हटले.

इस्रायलने नरसंहाराचे आरोप फेटाळले. गाझातील युद्ध हे स्वसंरक्षणासाठी असून हमासला लक्ष्य केले जात असल्याचे इस्रायलने म्हटले. रामल्लाह येथून बुधवारी टेलिव्हिजनवरून अब्बास यांनी हमासवर आतापर्यंतची सर्वात तीव्र सार्वजनिक टीका केली. इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी चर्चेला गती देण्याच्या प्रयत्नांदरम्यान ही टीका करण्यात आली. अब्बास यांनी हमासच्या ७ ऑक्टोबरच्या इस्रायलवरील हल्ल्याचा स्पष्ट निषेध केला नाही. मात्र, त्यांनी यापूर्वी हमासवर टीका केली होती. नागरिकांवरील हल्ल्यांचा निषेध त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

यावेळी पॅलेस्टाईन स्थापनेची दृष्टी त्यांनी मांडली. गाझातील युद्ध थांबवावे, इस्रायली सैन्याने माघार घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पॅलेस्टिनी राजकीय गटांना पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) अंतर्गत एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
अब्बास म्हणाले, "हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण सोडावे. सर्व व्यवहार पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि अधिकृत पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे सोपवावेत. शस्त्रे ठेवणे बंद करावे. पॅलेस्टिनी राज्याच्या कायद्यांनुसार राजकीय पक्ष म्हणून काम करावे आणि आंतरराष्ट्रीय वैधतेला मान्यता द्यावी."

२००७ पासून हमासने गाझावर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी पॅलेस्टिनी चळवळीला मोठे नुकसान केल्याचा आरोप अब्बास यांनी केला. "हमासने इस्रायलला मुक्त सेवा पुरवल्या, मग त्या हेतुपुरस्सर असोत वा नसोत. ओलिसांचे निमित्त पुढे करत इस्रायलला गाझातील आपली कटकारस्थाने आणि गुन्हे राबवण्याची संधी मिळाली," असे ते म्हणाले.

हमासने अब्बास यांचे आरोप फेटाळले. अब्बास यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हमासने म्हटले की, ते वारंवार आणि संशयास्पदरीत्या इस्रायलच्या आक्रमणाची जबाबदारी पॅलेस्टिनी लोकांवर ढकलतात.

आंतरराष्ट्रीय समुदायाने युनायटेड नेशन्सच्या ठरावांची अंमलबजावणी करावी आणि आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करावी, असे आवाहन अब्बास यांनी केले.

हमास आणि फतह यांच्यात दीर्घकाळ वैर आहे. पॅलेस्टाईनच्या दोन स्वतंत्र प्रदेशांना एका प्रशासनाखाली आणण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. २००७ पर्यंत पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे गाझाचे प्रशासन होते. २००६च्या निवडणुकीत हमासने विजय मिळवला आणि गाझावर ताबा घेतला. तेव्हापासून हमासवर गाझाचे  वर्चस्व आहे. 

हमास आणि फतह यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये कैरो येथे समेट करार केला होता. त्यानुसार दोन महिन्यांत एकतर्फी सरकार गाझाचे प्रशासन हाती घेणार होते. मात्र, २०१८ मध्ये पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे पंतप्रधान रामी हमदल्लाह यांच्या गाझा भेटीवेळी त्यांच्या ताफ्याजवळ बॉम्बस्फोट झाला. फतहने यासाठी हमासला दोष दिला गेला. गेल्या जुलैमध्ये हमास आणि फतह यांनी विभागणी संपवण्यासाठी आणि पॅलेस्टिनी एकता मजबूत करण्यासाठी करार केला.