पाकिस्तानी सैन्याने मिळवला अपहरण झालेल्या रेल्वेवर ताबा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानातील बोलन येथे ११ मार्चला दुपारी एक वाजता झालेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. क्वेटा ते पेशावर जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनवर फुटीरतावाद्यांनी हल्ला करून त्यावर ताबा मिळवला. या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) या फुटीरतावाद्यांच्या संघटनेने स्वीकारली. 

या घटनेत ३३ फुटीरतावादी ठार झाले असून, ४४० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात पाकिस्तान आर्मीला यश मिळाले आहे. या ऑपरेशनची संपूर्ण कहाणी आता समोर आली असून, पाकिस्तान आर्मीच्या मीडिया विंगने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

नेमके काय घडले?
११ मार्चला दुपारी बोलन परिसरात फुटीरतावाद्यांनी रेल्वे रुळावर बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे जाफर एक्सप्रेस रुळावरून घसरून त्यावर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला. या ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते, ज्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते काही सुरक्षा कर्मचारी आणि गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारीही सामील होते. 

बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना सांगितले की, त्यांनी २०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे. या संघटनेला पाकिस्तान सरकारने बंदी घातली असून, ती बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी कारवाया करत आहे.

पाकिस्तानी आर्मीपुढील आव्हाने
पाकिस्तान आर्मीच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे संचालक लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे पोहोचणे अत्यंत कठीण होते. हा परिसर रस्त्यापासून बराच दूर असल्याने लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. 

फुटीरतावाद्यांनी महिलांना आणि लहान मुलांना ढाल म्हणून वापरल्याने हे ऑपरेशन आणखी गुंतागुंतीचे बनले होते. तरीही पाकिस्तान आर्मी, वायुसेना, फ्रंटियर कोर आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या जवानांनी एकत्रित प्रयत्न करून हे ऑपरेशन यशस्वी केले.

लष्कराने सांगितले की, या ऑपरेशनमध्ये ३३ आतंकवादी ठार झाले. आतंकवादी सॅटेलाइट फोनद्वारे अफगानिस्तानातील आपल्या सहकाऱ्यांशी संपर्कात होते. ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ मार्चला १००  प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर १३ मार्चपर्यंत उर्वरित सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. दरम्यान ट्रेनचा ड्रायव्हरचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या ऑपरेशनमध्ये लष्कराला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. फुटीरतावाद्यांनी प्रवाशांमध्ये सुसाइड बॉम्बर्स ठेवले होते, त्यामुळे ऑपरेशनला विलंब झाला. परंतु लष्कराला  सर्व प्रवाशांची सुटका करण्यास यश मिळाले आहे. या कारवाईत रेल्वे पिकेटवर तैनात असलेले तीन फ्रंटियर कोर (एफसी) कर्मचारी मरण पावले, तर मंगळवारी ऑपरेशनदरम्यान आणखी एक एफसी जवान मरण पावला. 

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन पूर्ण झाले असून, सर्व फुटीरतावादी ठार झाले आहेत. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.