पहलगाम हल्ल्याने भारत-पाकिस्तान तणाव शिगेला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

२२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि लष्कर सतत कारवाईच्या तयारीत आहे. यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानने मोठे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी रशिया, चीन आणि पाश्चिमात्य देशांचा सहभाग असलेला प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, "आंतरराष्ट्रीय तपास पथक स्थापन व्हावे. हे पथक ठरवेल की भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे बोलत आहेत की खोटे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही आंतरराष्ट्रीय तपासाची सूचना केली आहे."

पाकिस्तानने काय म्हटले?
ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या आरोपांना पोकळ वक्तव्ये म्हटले आहे. केवळ बोलण्याने काही होणार नाही. पाकिस्तान किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही घटकाचा या हल्ल्यात हात आहे, याचे ठोस पुरावे द्यावेत, असे त्यांनी सांगितले. 

२२ एप्रिलला पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात २६ निष्पाप पर्यटक मारले गेले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला मानला जातो. लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या बंदीघटित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पंतप्रधानांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला. गुन्हेगार आणि कटकारस्थान करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला. सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगितले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार चिडलेले आहे.