पाकमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५० जण ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सलग दुसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. कुर्रम या आदिवासी जिल्ह्यात गुरुवारी बंदुकधाऱ्या दहशतवाद्यांनी प्रवासी वाहनांवर बेछूट गोळीबार केला. यात ५० लोक ठार झाले तर २९ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.

खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी हा हल्ला झाल्याला दुजोरा दिला आहे. 'हा एक मोठा हल्ला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,' असे ते म्हणाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि सैनिकांनी रस्ता रिकामा करून बचावकार्याला सुरुवात केली. पेशावर ते पाराचिनार आणि पाराचिनार ते पेशावरला जाणाऱ्या दोन प्रवासी वाहनांवर सशस्त्र दशतवाद्यांनी गोळीबार केला, अशी माहिती पाराचिनारच्या रहिवाशाने दिली. पोलिसांच्या सुरक्षेत चाळीस वाहने जात असताना पैकी दोन वाहनांवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

तणावाखाली कुर्रम
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून सशस्त्र शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. कुर्रम जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून विविध जमाती आणि गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात अनेक लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.