पाकिस्तान-अफगाण सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तान आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये तोर्कहम सीमेवर मोठी चकमक झाली आहे. २१ फेब्रुवारी पासून हा सीमाप्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी अचानक गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यामुळे सीमारेषेवरील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आपल्या घरांमधून पलायन सुरू केले आहे. 

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दावा केला आहे की, त्यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या ३० हून अधिक आतंकवाद्यांना मारले. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनावर टीटीपीच्या आतंकवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. 

अचानक झालेल्या या गोळीबारात पाकिस्तानच्या तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. यामध्ये कोणतीही नागरी हानी झाल्याची माहिती नाही. तोर्कहम आणि चमण सीमाप्रवेश बंद असल्यामुळे व्यापार, रुग्णवाहन सेवा, प्रवासी वाहतुकीसह अनेक सेवा पबंद आहेत. 

तालिबान सरकारने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये ४६ लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तालिबानने या हल्ल्यांना निर्घृण कृत्य म्हणून संबोधले आहे.

या घटनांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावग्रस्त बनले आहेत. सीमारेषेवरील चकमक आणि नागरिकांचे स्थलांतर या दोन्ही देशांच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. आगामी काळात या तणावाचे परिणाम दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर देखील दिसून येण्याची शक्यता आहे.