पृथ्वीच्या दिशेने दोन १०० फूट व्यासाचे लघुग्रह जात आहेत, अशी माहिती नासा ने दिली आहे. हे लघुग्रह आज पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नासाच्या सेंटर फॉर नियर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) नुसार, या दोन्ही लघुग्रह पृथ्वीपासून दूर असल्यामुळे याचा पृथ्वीला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन्ही लघुग्रह एकाच दिवशी पृथ्वीच्या जवळून जात असल्यामुळे ही घटना वैज्ञानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पहिला लघुग्रह १०० फूट आकाराचा असून तो पृथ्वीपासून १.९ दशलक्ष किलोमीटर दूरून जाणार आहे. तर दुसरा ११० फूट आकाराचा आहे आणि तो ४.३ दशलक्ष किलोमीटर दूरून जाणार आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही लघुग्रह 'नियर-अर्थ ऑब्जेक्ट' म्हणून वर्गीकृत केले गेले आहेत. या प्रकारचे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून जात असले तरी त्यांच्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स टीमने सांगितले की, या लघुग्रहावर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांचे निरीक्षण करण्यात येत आहे.
सतर्कतेची सूचना असली तरीही या प्रकारच्या घटनांबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. लघुग्रहांचा आकार आणि वेग कमी असल्यामुळे पृथ्वीला त्याचा कोणत्याही प्रकारे धोका नाही. नासानुसार, एखादी वस्तू १५० मीटरपेक्षा मोठी असेल आणि पृथ्वीच्या ४.६ दशलक्ष किलोमीटरच्या आत असेल तरच पृथ्वीला धोका असू शकतो.