भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळापासून ताणले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांना पत्र लिहिले आहे. बांगलादेशच्या स्थापनेत भारताने महत्वाची भूमिका बजावली होती आणि बलिदान हा दोन्ही देशांतील संबंधाचा पाया आहे, असे मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बैंकॉक येथे विम्सटेक राष्ट्रांची परिषद पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेला हजर राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन करण्याची विनंती बांगलादेशकडून करण्यात आली होती. केंद्र सरकारने या विनंताला अद्याप उत्तर दिलेले नसले तरी उभय देशांचील ताणलेले संबंध लक्षात घेता मोदी यांच्याकडून महंमद युनुस यांना वेळ दिला जाण्याची शक्यता कमी आहे.
या पार्श्वभूमीवर मोदी यांनी युनूस यांना लिहिलेल्या पत्राला महत्त्व आले आहे. चीनचा दौरा करण्यापूर्वी महंमद युनूस यानी मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, अशीही चर्चा आहे. मोदी यांती महंमद युनूस यांना लिहिलेल्या पुत्रात बांगलादेशच्या स्थापना दिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. १९७१चा मुक्तिसंग्राम भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या संबंधात मार्गदर्शकासारखा आहे. शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशमधील अवामी लोगचे सरकार येथील कट्टरतावाद्यांनी उलथवून लावले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून भारतात पळ काढावा लागला होता, बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर महंमद युनूस यांच्याकडे मुख्य सल्लागारपद देण्यात आले होते. सध्या तेच देशाचा कारभार पाहत आहेत.