पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.२१) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप (SOUL) कॉन्क्लेव्ह २०२५ चे उद्घाटन केले. हा कॉन्क्लेव्ह २१ आणि २२ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा असणार आहे. हे एक व्यासपीठ आहे जिथे राजकारण, क्रीडा, कला, आध्यात्म, सार्वजनिक धोरण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित राहणार आहे. एवढेच नाही तर, ते त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर चर्चा देखील करणार आहेत.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिपादन केले. ते म्हणाले की, "आज भारताला विविध क्षेत्रातील नेत्यांची आवश्यकता आहे. आपल्याला अशा लोकांची गरज आहे जे भारतीय विचारसरणीने आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन समजून घेऊन पुढे जातील."
ते पुढे म्हणतात, "राष्ट्र उभारणीसाठी चांगल्या नागरिकांचा विकास आवश्यक आहे. त्यामुळेच स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप महत्वाची आहे. हा विकसित भारताच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे."
पंतप्रधान मोदींनी भारत जागतिक स्तरावरील एक महासत्ता म्हणून सातत्याने उदयास येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. जागतिक दर्जाच्या नेत्यांनी ही उंची कायम ठेवण्याचे आणि विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठण्याचे आवाहन केले. अशा नेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप सारख्या संस्थांना त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात गुजरातचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "जेव्हा गुजरात वेगळे राज्य म्हणून स्थापन झाले तेव्हा नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेमुळे त्याच्या भविष्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु, गुजरातच्या नेत्यांनी राज्याच्या भरभराटीला मदत केली. गुजरातमध्ये हिऱ्यांच्या खाणी नसल्या तरीही गुजरात जगातील ९० टक्के हिऱ्यांवर प्रक्रिया करते.
स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप ही गुजरातमधील एक उदयोन्मुख नेतृत्व संस्था आहे. ही संस्था समाजातील व्यक्तींना सामाजिक कल्याणासाठी सक्षम करते. औपचारिक प्रशिक्षणाद्वारे भारतातील राजकीय नेतृत्वाचा विस्तार करणे आणि केवळ राजकीय वंशातूनच नव्हे तर गुणवत्तेने आणि समाज सेवेसाठी उत्कटतेने उदयास येणाऱ्या व्यक्तींना समाविष्ट करते.
राजकारण, व्यवसाय, क्रीडा, कला आणि सार्वजनिक धोरण यासारख्या विविध क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती असणार आहे. या दोन दिवसांच्या परिषदेने आदर्श आणि प्रभावी नेतृत्व तयार करण्यासाठी व विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
दरम्यान, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी गुरुवारी दिल्लीला भेट दिली होती. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी त्यांचे स्वागत केले. शेरिंग तोबगे यांनी देखील स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप कॉन्क्लेव्हला उपस्थिती दर्शवली. याविषयी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर माहिती दिली. ते म्हणाले की, "माझे मित्र पंतप्रधान शेरिंग तोबगे यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाला. लीडरशिप कॉन्क्लेव्हमधील त्यांनी दिलेल्या भाषणाचे कौतुक आहे. भारत आणि भूतानमधील अद्वितीय आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."