अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत. त्यामुळं जगभरातील राष्ट्रप्रमुखांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ट्रम्प यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. आपल्या या फोनवरील संभाषणाची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी माझ्या मित्रासोबत चांगला संवाद झाल्याचं म्हटलं आहे.

मोदी-ट्रम्प यांच्यात काय झाला संवाद?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ट्रम्प यांच्याशी फोनवरुन बोलणं झाल्याचं सांगितलं तसंच त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं की, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी खूप छान चर्चा झाली. त्यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत”

दरम्यान, एएनआयनं देखील आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवादाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. एनआयच्या ट्विटमध्ये म्हटलं की, “अमेरिकन निवडणुकीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांना फोन केला. काँग्रेसच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या निर्णायक विजयाबद्दल आणि कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांततेसाठी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली.

संपूर्ण जग पंतप्रधान मोदींवर प्रेम करतं, असं या संवादावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत हा एक भव्य देश आहे आणि पंतप्रधान मोदी हे एक भव्य व्यक्ती आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, ते त्यांना आणि भारताला खरे मित्र मानतात. ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, आपल्या विजयानंतर अभिनंदनासाठी सर्वात आधी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला.