मुस्लिम वर्ल्ड लीगने पहलगाम हल्ल्याचा 'असा' केला निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 10 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा इस्लामिक जगताने तीव्र निषेध केला आहे. मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इस्सा यांनी जेद्दाह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. हल्ल्याचा तीव्र निषेध करताना त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.

मुस्लिम वर्ल्ड लीगची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया 
मुस्लिम वर्ल्ड लीगने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. मुस्लिम वर्ल्ड लीगच्या हल्ल्याचा निषेध करत एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं, “इस्लामिक जगत हिंसा आणि दहशतवादाचा सर्व प्रकारे विरोध करत आहे. दहशतवादाला कोणत्याही धर्म किंवा संस्कृतीशी जोडले जाऊ शकत नाही. पहलगाममध्ये हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करतो.”

दहशतवादावर प्रतिक्रिया देताना मुस्लिम लीगने भारत-सौदीयांच्यातील संयुक्त निवेदनाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात सीमेपलीकडील दहशतवादाचा निषेध करताना दहशतवादी कारवायांचं समूळ उच्चाटन आणि दोषींना शिक्षा देण्याची गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे.”   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सहिष्णुता, संयम आणि सामाजिक एकतेच्या कार्याचं कौतुक केलं. भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम्' तत्त्वाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “भारत हा बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक समाज असलेला देश आहे. विविधतेत एकता हा भारताच्या सामर्थ्याचा आधार आहे. दहशतवाद, अतिरेक आणि हिंसाचाराविरोधातील मुस्लिम वर्ल्ड लीगच्या ठाम भूमिकेचं मी स्वागत करतो.” 

याशिवाय त्यांनी भारत आणि मुस्लिम लीगच्या काही देशांच्या मैत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले, “आज संरक्षण, व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत भारत आणि इतर इस्लामिक राष्ट्रांची भागीदारी दृढ झाली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक बंध दोन्ही देशांमधील नात्याचा भाग आहेत.”  याशिवाय मुस्लिम वर्ल्ड लीग ने  'विविधता आणि सौहार्द शिखर परिषद' भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाल्याची माहिती जाहीर केलेल्या निवेदनात दिली आहे. 

मुस्लिम वर्ल्ड लीगच्या भूमिकेविषयी बोलताना राजकीय विश्लेषक म्हणतात, “पहलगाम हल्ल्याच्या निषेधात इस्लामिक जगताची एकजूट दिसून येणं ही मोठी बाब आहे. मुस्लिम वर्ल्ड लीगच्या निषेधाने दहशतवादाला धर्माशी जोडण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडले आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून त्याविरोधात सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सहकार्य दहशतवादाविरोधातील लढाईला ताकद देईल. इस्लामिक जगताचा पाठिंबा भारतासाठी महत्वाची बाब आहे.” 

काय आहे मुस्लिम वर्ल्ड लीग 
मुस्लिम वर्ल्ड लीग ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय मक्का येथे असून याची स्थापना १९६२ मध्ये झाली. यामध्ये इस्लामिक देश आणि पंथांमधील सदस्य या संस्थेत सामील आहेत. इस्लामचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे या संस्थेचं ध्येय आहे. सहिष्णुता, मानवतावादी मदत आणि सर्व संस्कृतींना सहकार्य करून हिंसा रोखून शांततेचा संदेश देणं यामागचा उद्देश आहे.

मुस्लिम वर्ल्ड लीग ही संस्था कुराण आणि सुन्नाहमधील इस्लामचे सहिष्णु मूल्यं लोकांपर्यंत पोहोचवते. मुस्लिम समुदायासमोरील समस्या सोडवणं आणि मतभेद दूर करणं यावर या संस्थेचा भर आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समुदायांच्या समस्या त्या देशांच्या कायद्यांच्या चौकटीत सोडवल्या जातात. हजच्या काळात विद्वान, बुद्धिजीवी आणि संघटनांचे प्रमुख यांच्या भेटी घडवून मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी उपाय सुचवले जातात. इस्लामिक ओळख जपताना मुस्लिम समाजाची एकता आणि जागतिक स्थान बळकट करणं हे संस्थेच्या उद्दिष्ठांपैंकी एक आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter