मर्कज नॉलेज सिटीने जिंकला ग्रीन अँड सस्टेनेबल स्मार्ट सिटी अवॉर्ड.
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील ‘मर्कज नॉलेज सिटी’ या प्रकल्पाला भारतातील प्रतिष्ठित ग्रीन अँड सस्टेनेबल स्मार्ट सिटी अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीज इंडिया अवॉर्ड्स अंतर्गत देण्यात आलेला हा पुरस्कार इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, भारत सरकारच्या वाणिज्य विभाग आणि एक्झिबिशन इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला २८ देशांमधून सुमारे ५०,००० हून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. पुरस्काराच्या अंतिम स्पर्धेत उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड आणि झाशी स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यासोबत मर्कज नॉलेज सिटीचा समावेश होता. कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर मर्कज नॉलेज सिटीने हे प्रतिष्ठित पारितोषिक जिंकले. हरित आणि शाश्वत शहरीकरण याबाबत मर्कज नॉलेज सिटीच्या मॉडेलच्या वेगळेपणावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
मर्कज नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दुल सलाम मोहम्मद यांनी सहकाऱ्यांसह हा पुरस्कार स्वीकारला आणि त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत त्यांना 'मर्कज नॉलेज सिटी'ची अभिनव कल्पना समजावून सांगितली.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरीकरणाचा नवा आदर्श
भारतामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प मुख्यतः मोठ्या महानगरांमध्ये विकसित केले जातात. परिणामी, या शहरांमध्ये लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण होते. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण यांसोबतच पायाभूत सुविधांवरील ताण वाढतो.
मात्र या पारंपरिक संकल्पनेला छेद देत ग्रामीण-शहरी समन्वयाच्या अभिनव मॉडेलवर मर्कज नॉलेज सिटी विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत परिसरातील तब्बल 40 गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या शहराच्या विकासाचा भाग बनवले आहे.
मर्कज नॉलेज सिटीचा हा दृष्टिकोणभारत सरकारच्या PURA (Providing Urban Amenities to Rural Areas) योजनेल सुसंगत आहे. ग्रामीण भागात शहरी दर्जाच्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातून मोठ्या शहरांमध्ये होणारे स्थलांतर रोखले जाते आणि गावांमध्येच समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
निसर्गस्नेही उपायांचा अवलंब
मर्कज नॉलेज सिटीमध्ये पर्यावरणीय शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अक्षय ऊर्जेचा वापर केला जातो. उर्जेच्या आवश्यकतेसाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर केला जातो. शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण आणि पाणी पुनर्वापर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग इथे केला गेलाय.
मर्कज नॉलेज सिटीतील 40 टक्के जागा हरितक्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथील सर्व इमारती ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इथे विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. या पर्यावरणपूरक उपायांमुळे शहराच्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य प्रकारे पुनर्वापर तर होतोच, सोबतच भविष्यातील हवामान बदलांच्या परिणामांना सामोरे जाण्याची क्षमतादेखील वाढते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी संकल्पना
मर्कज नॉलेज सिटीचा उद्देश केवळ शहरी पायाभूत सुविधा विकसित करणे नसून, परिसरातील ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठीही तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या शहरात स्थानिक उत्पादक आणि कारागीर यांना थेट शहरी बाजारपेठेशी जोडण्याची व्यवस्था आहे. यामुळे स्थानिक वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण होऊ लागली आहे आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही वाढू लगल्या आहेत.
या उपक्रमाच्या अंतर्गत जवळपास 20,000 कुटुंबांना युनिव्हर्सल बेसिक इनकम (UBI) प्रदान करण्याचा मानस आहे. सुमारे 1 लाखाहून अधिक नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे. याशिवाय, कापड उद्योग, अन्न प्रक्रिया, आरोग्यसेवा आणि लघुउद्योग यांसारख्या स्थानिक उद्योगांना मर्कज नॉलेज सिटीमुळे चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प ग्रामीण भागाच्या आर्थिक स्वयंपूर्णतेकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
शहरीकरणाच्या समस्यांवर उपाय
शहरीकरणाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रक्रियेमुळे भारतातील महानगरांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहतूक कोंडी, प्रदूषण, अनियंत्रित वस्ती आणि पायाभूत सुविधांवरील ताण या समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. मर्कज नॉलेज सिटीसारखी नवी मॉडेल्स ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, जर या प्रकारच्या शाश्वत शहरांची संकल्पना देशभरात राबवली गेली, तर पुढील दहा वर्षांत भारतातील मोठ्या शहरांवरील लोकसंख्येचा ताण 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तसेच, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत सुमारे 50 अब्ज डॉलर्सचे मूल्य निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून देशातील असंख्य लहान शहरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित होईल आणि भारताच्या हवामान बदल प्रतिबद्धतेलाही हातभार लागेल.
स्मार्ट सिटी म्हणजे केवळ गगनचुंबी इमारती नव्हेत
स्मार्ट सिटी म्हटले की, सामान्यतः उंच इमारती, आधुनिक वाहतूक प्रणाली आणि मोठे व्यावसायिक संकुल हेच चित्र आपल्या मनात उभे राहते. मात्र, मर्कज नॉलेज सिटीने या संकल्पनेला नवा आयाम दिला आहे. ही केवळ आधुनिक पायाभूत सुविधा असलेली जागा नसून, पर्यावरणपूरकता, आर्थिक स्वायत्तता आणि ग्रामीण-शहरी सहजीवन यांचे परिपूर्ण मॉडेल म्हणून पुढे आले आहे.
भविष्यातील शहरीकरण हे केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातही स्मार्ट आणि स्वयंपूर्ण केंद्र निर्माण करून शक्य होऊ शकते. भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी अशा प्रकारच्या शाश्वत आणि संतुलित शहरांची संकल्पना आवश्यक आहे. मर्कज नॉलेज सिटीच्या यशस्वी मॉडेलने हीच बाब अधोरेखित केली आहे.
त्यामुळेच, मर्कज नॉलेज सिटीला मिळालेला हा पुरस्कार केवळ एका शहराचा सन्मान नसून, भारताच्या पर्यावरणपूरक आणि समतोल विकासाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेला नव्याने आकार देणाऱ्या अशा अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
'मर्कज नॉलेज सिटी'विषयी
केरळमधील महत्त्वाकांक्षी शैक्षणिक,सांस्कृतिक आणि निवासी संकुल म्हणून 'मर्कज नॉलेज सिटी'चा लौकिक आहे. या प्रकल्पाची संकल्पना जमीयतुल उलेमा ए हिंदचे महासचिव आणि प्रसिद्ध इस्लामिक विद्वान शेख अबूबकर अहमद यांनी मांडली. तर केरळमधील प्रसिद्ध विद्वान आणि धर्मगुरू अब्दुल हकीम कांडी 'मर्कज नॉलेज सिटी'चे व्यवस्थापकीय संचालक अर्थात एमडी म्हणून कार्यरत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter