लॉस एंजेलिसच्या वणव्याची दाहकता कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
लॉस एंजेलिस येथे पेटलेला वणवा
लॉस एंजेलिस येथे पेटलेला वणवा

 

लॉस एंजेलिसनजीकच्या जंगलात लागलेल्या वणव्याची दाहकता अद्याप कमी झालेली नाही. यातील मृतांची संख्या सोमवारी २४ झाली असून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

लॉस एंजेलिस काउंटीमध्ये गेल्या मंगळवारी (ता.७) जंगलाला एकाच वेळी सहा वणवे लागल्याने परिसरात सर्वत्र ही आग पसरली. यात शेकडो घरे, इमारती, वाहने खाक झाली. वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी सांता ॲना वाऱ्याचा वेग वाढल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पाण्याचे आणखी ७० टँकर देण्यात आले असल्याचे लॉस एंजेलिस काउंटीच्या अग्निशामक दलाचे प्रमुख अँथोनी मॅरोन यांनी सांगितले. किनारपट्टीवरील भागात ३० ते ५० प्रतिकिलोमीटर वेगाने आणि आणि लॉस एंजेलिस आणि व्हेंचुरा काउंटीच्या पर्वतांमध्ये ७० किलोमीटर प्रतितास वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज ‘नॅशनल वेदर सर्व्हिस’ने व्यक्त केला आहे.

पॅसिफिक पॅलिसेड्‌स आणि पॅसिफिक कोस्ट हायवे या परिसरातील २३ हजार एकर क्षेत्रासह सुमारे ४० हजार एकर जमीन आगीत भस्मसात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत पॅलिसेड्समधील केवळ १३ टक्के क्षेत्रावरील आग आटोक्यात आली होती. अल्टाडेन आणि पॅसेडेनामधील १४ हजार एकर क्षेत्रावर आग पसरली असून केवळ २७ टक्के परिसरातील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

आग नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याचे खापर अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांच्यावर फोडले आहे. ‘‘ते आगही आटोक्यात आणू शकत नाही. त्यांना झाले तरी काय?,’ अशी टीका ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या त्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठावरून केली आहे.

अमेरिकेतील होम बॉक्स ऑफिस’ (एचबीओ) या सशुल्क दूरचित्रवाणी नेटवर्कची ‘एमी पुरस्कारविजेती मालिका ‘सक्सेशन’मध्ये झळकलेला १२ कोटी ५० लाख डॉलरचा आलिशान हवेली वणव्याच्या ज्वाळांमध्ये स्वाहा झाला. पॅसिफिक पॅलिसेड्‌समधील ही हवेली लुमिनार टेक्नॉलॉजिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑस्टिन रसेल यांनी ही हवेली २०२१ मध्ये आठ कोटी ३० लाख डॉलरला खरेदी केली होती. सुमारे २० हजार चौरस फुटावरील या हवेलीत सहा खोल्या, १८ स्वच्छतागृहे होती. त्याचे मासिक भाडे चार लाख ५० हजार डॉलर होते.

२५० ते २७५ अब्ज डॉलरचे नुकसान
वणव्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये एकूण नुकसान आणि आर्थिक नुकसान २५० ते २७५ अब्ज डॉलर एवढे असल्याचा सुधारित अंदाज अमेरिकेतील ‘ॲक्युवेदर’ या हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. अमेरिकेतील आधुनिक इतिहासातील ही आग सर्वांत विनाशकारी ठरली आहे. आलिशान घरांची पडझड, विषारी धुरामुळे आरोग्यावरील दीर्घकालीन परिणाम आणि अन्य नुकसानीचा यात समावेश आहे.

किम कार्दिशियानने मानले आभार
‘लॉस एंजेलिसमध्‍ये लागलेल्या आगीतून आम्हा सर्वांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावणारी अग्निशमन यंत्रणा आणि कॅलिफोर्नियाच्या राज्याचे अग्निशामक दल यांचे आभार,’ अशी पोस्ट प्रसिद्धी अभिनेत्री किम कार्दिशियान हिने केली आहे. या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देण्याची मागणी तिने केली आहे.

वणव्यामुळे झालेले नुकसान
  • हर्स्ट
  1. ८९ % नियंत्रणात आणलेली आग
  2. ८०० एकर भस्मसात झालेला प्रदेश
  • केनेट
  1. १०० % नियंत्रणात आणलेली आग
  2. १,००० एकर भस्मसात झालेला प्रदेश
पॅलिसेड
  1. ११ % नियंत्रणात आणलेली आग
  2. २३,७१३एकर भस्मसात झालेला प्रदेश
इटाॅन
  1. २७ % नियंत्रणात आणलेली आग
  2. १४,११७एकर भस्मसात झालेला प्रदेश
सनसेट
  1. आग पूर्ण नियंत्रणात आली
लाॅस एंजेलिस
  1. येथील नागरिकांना स्थलांतर करावे लागले
  2. येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देत स्थलांतरासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले
  3. सुमारे ४०,०००एकर क्षेत्र भस्मसात
  4. ६,०००इमारतींचे नुकसान
  5. ३,१९,०००नागरिकांचे स्थलांतर तर काहींना सावधानतेचा इशारा
  6. १६आगीत मृत्युमुखी पडलेले नागरिक

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter