इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दूरसंवाद साधत गाझा पट्टीतील राफा शहरात एकवटलेल्या दहा-पंधरा लाखांवर पॅलेस्टिनींना मानवतेच्या भूमिकेतून सर्व प्रकारची मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा; नाहीतर राफावरील हल्ल्यासाठी मदत देणार नाही, असा इशारा दिला आहे.
त्याबाबत इस्राईलची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, बायडेन यांना नेतान्याहूंना सुनावले हेही बरेच झाले. साधारण तीन आठवड्यापूर्वीही मानवतेच्या भूमिकेतून पॅलेस्टिनींना मदतपुरवठ्याचा मार्ग खुला न ठेवल्यास इस्त्राईलला सहकार्य करणार नाही, असा इशारा अमेरिकेने दिला होता.
त्यानंतर आता उभयतांमध्ये चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील ख्यातनाम हार्वर्ड, प्रिन्स्टन, ‘एमआयटी’सह येल, स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया अशा अनेकानेक विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी पॅलेस्टिनींवरील हल्ल्याला विरोध आणि त्यांना मानवतेच्या भूमिकेतून विनाअडथळा मदत पुरवावी, यासाठी आंदोलने, निदर्शने चालवली आहेत.
कारवाईचा बडगा दाखवला तरी त्याचा वणवा थांबायचे नाव घेत नाही. हा जनमताचा रेटा बायडेन यांना दूरसंवादाला भाग पाडणारा ठरला, असे म्हणता येईल. इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धाला सहा महिने झाले तरी ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
जगभरातूनच उभयतांवर शस्त्रसंधी करा, युद्ध थांबवा, यासाठी विविध पातळ्यांवर आणि देशादेशांकडून दबाव वाढत आहे. इस्त्राईलवर इराणकडून हल्ले होताहेत. लेबनॉनच्या बाजूने हिज्बोल्लाच्या कारवाया सुरू आहेत. त्याचवेळी कतारच्या मध्यस्थीने अमेरिका, इजिप्त यांच्या सहकार्याने इस्त्राईल, हमास यांच्यात चर्चेद्वारे तोडग्याचे प्रयत्न जारी आहेत.
तथापि, दोन्हीही बाजूंनी आडमुठेपणाची, हेकेखोरपणाची भूमिका अडथळे आणत आहे. युद्धाला तोंड फुटल्यापासून बहुतांश महिला, मुलांसह चौतीस हजारांवर पॅलेस्टिनींनी जीव गमावला आहे. गेल्या नोव्हेंबरात उभयतांमध्ये झालेली शस्त्रसंधीने काहीसे विश्वासाचे, आशेचे वातावरण तयार झाले होते.
ते पुन्हा निवळत असतानाच अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह वीस देशांनी ‘हमास’ने शस्त्रसंधीला तयार व्हावे म्हणून दबाव वाढत आहे. दुसरीकडे पॅलेस्टिनी समर्थकांकडून अमेरिकेसह इतर देशांनी इस्त्राईलवर नरसंहार थांबवण्यासाठी आपली मात्रा चालवावी, अशी मागणी होत आहे.
तथापि, गुप्त आणि खुल्या अशा दोन्हीही चर्चांमध्ये प्रगती होताना दिसत नाही; यामागील कारण म्हणजे, `हमास’च्या अवास्तव मागण्या आणि इस्त्राईलचा ‘हमास’ला चिरडल्याशिवाय माघार नाही, हा पवित्रा!
पाच वर्षांची शस्त्रसंधी करू, प्रसंगी शस्त्रे खाली ठेऊन संघटनेचे स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या राजकीय पक्षात रुपांतर करू, पण त्यासाठी १९६७ प्रमाणे सीमा हव्यात, अशी भूमिका ‘हमास’ची आहे. ज्या ‘हमास’च्या हल्ल्यामुळे चवताळून आक्रमकतेने इस्त्राईल त्याला चिरडायला निघाला आहे, त्याने ती भूमिका फेटाळली आहे.
त्यामुळेच पॅलेस्टिनींच्या दयनीय अवस्थेला इस्त्राईलचा हल्ला जितका कारणीभूत आहे, तितकेच ‘हमास’चे भलते साहस आणि अतिअवास्तववादी मागण्याही. त्यामुळे वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. एकमेकांना विश्वास देण्याने आणि घेण्यानेच युद्धविरामाचा मार्ग सापडणार आहे, हे दोघांना लक्षात घ्यावे लागेल.
दुसरी शस्त्रसंधी सहा आठवड्यांची करावी, चाळीस आजारी इस्त्राईलींची सुटका करावी, त्याबदल्यात इस्त्राईलने शेकडो पॅलेस्टिनी महिला, मुले, ज्येष्ठांची सुटका करावी, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. तो स्वीकारून उभयतांनी सहमतीचे पाऊल टाकणेच व्यापक हिताचे आहे.
युद्धासाठी हवा तेवढा दारुगोळा पुरवायचा, वातावरणनिर्मिती करायची आणि त्याचे परिणाम भयावह वाटू लागले की, मानभावीपणा दाखवायचा, असा प्रकार सध्या अमेरिकेने इस्त्राईलबाबत चालवला आहे.
अमेरिकेच्या सिनेटने नुकतेच युद्धग्रस्त इस्त्राईल आणि युक्रेन यांना अनुक्रमे ९५ व २६ अब्ज डॉलर आणि चिनी आक्रमणाच्या धास्तीतील तैवानला आठ अब्ज डॉलरच्या मदतीला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्याचे स्वरुप पाहिले तर अमेरिकेचा दुटप्पीपणा दिसून येतो. इस्त्राईलच्या शस्त्रास्त्रखरेदी आणि त्यांच्या उत्पादनवाढीसाठी साडेचार अब्ज डॉलर आणि मानवतावादी मदतीसाठी नऊ अब्ज डॉलर आहेत. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे घोंगावत आहे.
बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत जवळजवळ निश्चित आहे. मात्र बायडेन यांना आंतरराष्ट्रीय पटलावर परंपरागत अंकल सॅम’चा बडगा दाखवता आलेला नाही. मानवतेच्या नावाने नक्राश्रू गाळायचे आणि दुसरीकडे स्वार्थी अर्थकारण करायचे, या अमेरिकी वृत्तीवर जगभरातच नव्हे अमेरिकेतही टीकाटिपणी होत आहे.
त्यामुळे धरलं तर चावतंय... अशी अवस्था झालेल्या अमेरिकेला इस्राईल-हमास युद्ध कधी संपेल, असे झाले आहे. म्हणूनच राफावरील हल्ल्यापासून इस्त्राईलला रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात बायडेन अपयशी ठरले, तर त्याची मोठी किंमत व्यक्तिशः त्यांना आणि अमेरिकेला चुकवावी लागेल, हे निश्चित.
दुसऱ्याला स्वातंत्र्य देते ते खरे प्रेम. मालकीहक्क गाजवणे म्हणजे प्रेम नव्हे.
- रवींद्रनाथ टागोर