युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाल्याचा इस्राईलचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सीरिया आणि लेबनॉनमधील हिज्बुल्ला संघटनेच्या शेकडो दहशतवाद्यांच्या पेजरमध्ये स्फोट होऊन झालेल्या हल्ल्यानंतर पश्‍चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे. आरोपाची सुई इस्राईलच्याच दिशेने असल्याने हिज्बुल्ला संघटनेने सूड घेण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर इस्राईलनेही लेबनॉनला लागून असलेल्या आपल्या उत्तर सीमेवर सैन्याची जुळवाजुळव सुरू केली असून युद्धाचा हा नवा टप्पा असल्याचे या देशाचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलन्ट यांनी जाहीर केले आहे.

सीरिया आणि लेबनॉनमध्ये मंगळवारी झालेल्या पेजर हल्ल्यात आणि दुसऱ्या दिवशी झालेल्या वॉकीटॉकी हल्ल्यात मिळून ३२ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे साडे तीन हजार जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लेबनॉनमध्ये तळ असलेल्या हिज्बुल्लाने इस्राईलच्या उत्तर भागात काल (ता. १८) रात्री रॉकेट हल्ले केले.

त्यानंतर इस्राईलने उत्तर सीमेवर सैन्याची कुमक वाढवली आहे. ‘‘आपल्या युद्धाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आपल्या धैर्य, ठामपणा आणि चिकाटी यांची ही परीक्षा आहे,’’ असे संरक्षण मंत्री गॅलन्ट यांनी आपल्या सैनिकांना सांगितले.

गाझामधील संघर्षावेळी जोरदार हल्ले करणारी सैन्याची विशेष तुकडीही उत्तर सीमेवर तैनात करण्यात आली आहे. या तुकडीत रणगाडे, कमांडो आणि छत्रीधारी सैनिकांसह हजारो सैनिकांचा समावेश आहे. सीमेवर अटीतटीचे युद्ध करण्याचे या तुकडीला विशेष प्रशिक्षण दिलेले आहे. याच तुकडीने गाझा पट्टीतील हमासचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या खान युनिस शहराला उद्ध्वस्त केले होते.

दरम्यान, लेबनॉन आणि सीरियामध्ये बुधवारी हिज्बुल्लाच्या अनेक दहशतवाद्यांच्या हातातील वॉकीटॉकीचा स्फोट झाला होता. या वॉकीटॉकी ‘आयकॉम’ या जपानी कंपनीने तयार केलेल्या आहेत. मात्र, स्फोट झालेल्या वॉकीटॉकींचे उत्पादन दहा वर्षांपूर्वीच बंद केले होते, असा दावा ‘आयकॉम’ने केला आहे.