सध्या केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून भारताने हज यात्रेसाठी करार केला आहे. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धार्मिक आणि द्विपक्षीय संबंधांना आणखी दृढ करत, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री डॉ. तौफीक बिन फौजान अल-रबिया यांनी हज २०२५ करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे १,७५,०२५ भारतीय हज यात्रींकरिता कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा निर्णय जगातील सर्वात मोठ्या धार्मिक हज यात्रेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे.
सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी मस्जिद-ए-नबवीला भेट दिली. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “हा खरोखरच एक विस्मरणीय आणि आध्यात्मिक अनुभव आहे.” तसेच इस्लामच्या दुसऱ्या सर्वात महत्वाच्या पवित्र स्थळांपैकी असलेल्या मशीद-ए-नबवीला भेट देणे हे आपले सौभाग्य असल्याचे मानले आहे. याशिवाय रिजीजू यांनी प्रसिद्ध मस्जिद क़ुबा मशीद आणि ऐतिहासिक माउंट उहुदचे देखील दौरे केले. त्यांनी या स्थळांची धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वता जाणून घेतली.
हज यात्रींसंबंधीतील महत्वाचा करार
जेद्दामध्ये झालेल्या भव्य समारंभात किरण रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री डॉ. तौफीक बिन फौजान अल-रबिया यांनी करारावर स्वाक्षरी केली. या वेळी मंत्री रिजिजू यांनी म्हटले, “हा करार भारतीय हज यात्रेकरूंसाठी महत्वपूर्ण असणार आहे आणि सौदी अरेबियासोबत भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना आणखी दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
या करारानुसार, ७०% भारतीय यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून, तर उर्वरित 30% खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेला जाऊ शकतील. याविषयी अल्पसंख्याक रिजिजू म्हणाले, “भारतीय हज यात्रेकरूंना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हा करार त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी करेल.”
यावेळी डॉ. तौफीक बिन फौजान अल-रबिया यांनी भारत आणि सौदी अरेबियामधील दीर्घकालीन संबंधांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “सौदी अरेबिया भारतीय तीर्थ यात्रेकरूंना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि दोन्ही देशातील आपापसातील संबंध असेच मैत्रीपूर्ण राहतील.”
या बैठकीवेळी हज यात्रेच्या मुद्द्यावर महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांनी हज यात्रा २०२५च्या दरम्यान भारतीय तीर्थ यात्रेकरूंना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी अजून काय सुधारणा करता येतील यावर चर्चा केली. यामध्ये तीर्थ यात्रेकरूंच्या निवास, परिवहन आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. हज संचालन अधिक प्रभावीपणे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केल्याने भारतीय हज यात्रींना सर्व सेवा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या मुद्द्यावर सहमत दर्शवण्यात आली.
वाहतूक आणि परिवहनमध्ये सहयोग
रियादमधील सौदी अरेबियाचे वाहतूक आणि परिवहन मंत्री सालेह बिन नासिर अल-जस्सर आणि किरेन रिजिजू यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील वाहतूक क्षेत्रातील सहयोगावर चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात हज यात्रेकरूंकरिता हवाई सेवा आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्याची शक्यता दर्शवली गेली.
जेद्दा हज टर्मिनलचे निरीक्षण
या भेटीदरम्यान अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू मदीना आणि जेद्दा या ठिकाणी हज २०२५च्या संचालनासाठी सौदी अरेबियाने केलेल्या व्यवस्था पाहणार आहेत. रिजिजू जेद्दा हज टर्मिनलचे दौरे करणार आहेत. त्याठिकाणी ते हज यात्रेकरूंच्या स्वागत आणि निवास व्यवस्था देखील पाहणार आहेत. याशिवाय ते हज संचालन सुरळीत आणि प्रभावी करण्यासाठी सौदी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधणार आहेत.
भारत-सौदी संबंधांना नवी ऊर्जा
हा करार फक्त हज यात्रा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा नाही, तर भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील व्यापक संबंधांना सुद्धा बळकट करणारा आहे. दोन्ही देशांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात आपले संबंध आणखी घट्ट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.
मंत्री रिजिजू यांनी सांगितले, “हज २०२५ साठी हा करार दोन्ही देशांमधील आपला विश्वास आणि सहकार्यातील प्रतीक आहे. भारत हज यात्रेकरूंना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी प्रतिबद्ध आहे, आणि त्यांच्या अनुभवाला अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा करार भारतीय हज यात्रेकरुंसाठी आनंदाची बातमी देणार आहे. तसेच आमचे सरकार त्यांच्या प्रवासाचा अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी कटिबद्ध आहे.” मोदींनी सौदीअरेबियाचे आभार मानले आणि या सहकार्यामुळे भारताच्या तीर्थयात्रेकरूंना फायदा होईल, असे म्हटले आहे.