अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२१) भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील एफबीआय या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली. दरम्यान एफबीआयचे नववे संचालक म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथ घेतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
वॉश्गिंटन येथील व्हाईट हाऊस संकुलातील आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस इमारतीमधील इंडियन ट्रीटी दालनात काश पटेल यांचा शपथविधी झाला. अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या देखरेखीखाली हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. दरम्यान यावेळी काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीयांकडून त्यांच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची कौतुकाची थाप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांचे याआधी कौतुक केले होते. एफबीआय एजन्ट्सकडून त्यांना पाठिंबा मिळाला असल्याचेही ट्रम्प म्हणाले. ते म्हणतात की, "काश मला आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्व एजंट्सना त्याच्याप्रती असलेला आदर."
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, "काश पटेल आतापर्यंतचा सर्वोत्तम संचालक म्हणून ओळखला जाईल. तो एक अतिशय मेहनती आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका आहेत."