इस्त्रायलने रविवारी गाझा पट्टीची संपूर्ण वीज पुरवठा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय हमासला दबावात आणून, त्यांच्याकडून इस्त्रायली ओलिसांना सोडवण्यासाठी घेतला गेलाय. पण यामुळे गाझातल्या २० लाखांहून जास्त लोकांचे आयुष्य अंधारात गेले आहे. ऊर्जा मंत्री एली कोहेन यांनी हा आदेश जारी केला आणि सांगितलं की, "आम्ही सगळी हत्यारं वापरू, ओलिसांना परत आणू आणि हमासचा गाझातून कायमचा नायनाट करू."
गाझात वीज बंद झाल्याने सगळ्यात मोठा फटका तेथील जल प्रकल्पांना बसला आहे. हे प्रकल्प समुद्राचे खारे पाणी गोड करून लोकांना प्यायला देतात. आता वीज नाही तर पाणी कसं मिळणार? इस्त्रायलने पाण्याचा पुरवठाही बंद करण्याचे संकेत दिले आहेत. युद्धात आधीच गाझाची वीज यंत्रणा उद्ध्वस्त झाली होती. लोक तिथे जनरेटर आणि सोलर पॅनल्सच्या आधारावर कसेतरी जगत होते. परंतु आता हा निर्णय म्हणजे तिथल्या लोकांसाठी आणखी एक संकट आहे.
युद्धाला कारण ठरलेला हमासचा हल्ला ऑक्टोबर २०२३ मध्ये झाला होता. त्यांनी त्यावेळी इस्त्रायलवर हल्ला करून १,२०० लोकांना ठार मारले आणि २५१ जणांना बंधिस्त ठेवले होते. आत्ता त्यातले बरेच जण याआधीच्या शांतता करारातून सुटले. पण अजूनही २४ जिवंत बंधक आणि ३५ मृतदेह हमासकडे असल्याची माहिती मिळत आहे.
हमासने रविवारी इजिप्तच्या मध्यस्थांशी बोलणी केली, परंतु त्यांनी आपले म्हणणे बदलले नाही. ते म्हणतात, "आम्हाला शांततेच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा हवी, जिथे ओलिसांना सोडू, इस्त्रायली सैन्य मागे हटेल आणि युद्ध कायमचं थांबेल." या सगळ्या गडबडीत शांतता कराराची बोलणी पुन्हा सुरू होणार आहेत. १ मार्चला पहिला टप्पा संपला, आणि आता सोमवारपासून कतारमध्ये चर्चा होईल. इस्त्रायलला पहिला टप्पा वाढवायचाय, पण हमास दुसऱ्या टप्प्यावर अडलाय. गाझातलं युद्ध थांबावं, असं दोघांनाही वाटतंय, पण अटींवरून घोळ सुरू आहे.
या युद्धात गाझात ४८,००० हून जास्त लोक मारले गेलेत, त्यातले बहुतांश महिला आणि मुलं आहेत, असे हमासच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. गाझाची अवस्था युद्धाने बिकट झालीय. घरं, रस्ते, पाणी-वीज सगळं उद्ध्वस्त झालंय. आता वीज बंद झाल्याने लोकांचं जगणं आणखी कठीण होणार आहे.