पॅलेस्टाइनच्या गाझा मध्ये ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलचे सतत हल्ले सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मरण पावले आहेत. त्याचबरोबर एक लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारामुळे दहा लाखांहून अधिक जणांना शरणार्थी कॅम्पचा आसरा घ्यावा लागला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील एका घटनेने वेगळे वळण घेतले आहे. नुकतेच इस्रायली नागरिकांनी इस्रायली संरक्षण दल (IDF) चे मेजर जनरल डेव्हिड झिनी यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
इस्रायलच्या गाझा सीमेवरील नागरिकांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करत एका बैठकीदरम्यान मेजर जनरल झिनी यांच्यावर शारीरिक हल्ला केला. नागरिकांचा आरोप आहे की, युद्धाच्या काळात सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींमुळे त्यांना धोका वाढला आहे.
नेमका कसा झाला हल्ला
एका बैठकीदरम्यान, सीमेवरील गावकऱ्यांनी झिनी यांच्यावर शाब्दिक टीका करत राग व्यक्त केला. त्यानंतर परिस्थिती बिघडली आणि काही नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत झिनी यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे.
नागरिकांचा आक्रोश
गाझा सीमेवरील गावकरी दीर्घकाळापासून हमासच्या हल्ल्यांमुळे त्रस्त आहेत. ऑक्टोबर ७ रोजी झालेल्या हमासच्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर इस्रायली नागरिक ठार झाले होते. त्यामुळे, या सीमेवरील नागरिकांनी सरकारकडे आणि लष्कराकडे वारंवार त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
लष्कराची भूमिका
इस्रायलचे लष्कर या घटनेबाबत गांभीर्याने विचार करत असून मेजर जनरल झिनी यांनीही या संतापाचा सामना शांततेने केला. या घटनेनंतर इस्रायली लष्कराने नागरिकांन सुरक्षेच्या उपाययोजना आणखी मजबूत केल्या जातील असे आश्वासन दिले आहे.
परिस्थितीचे महत्त्व
या घटनेमुळे इस्रायली लष्कर आणि नागरिकांमधील तणाव स्पष्टपणे सामोर आला आहे. सोबतच नागरिकांचा सरकार व लष्करावरचा विश्वास कमी झाल्याचे दिसते. इस्रायली नागरिकांनी लष्करावर हल्ला करायची ही पहिलीच घटना आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे देशांतर्गत तणाव वाढल्याचेच यातून दिसत असून आंतरराष्ट्रीय समुदायाचेही या घटनेकडे लक्ष वेधले गेले आहे. इस्रायलमधील ही घटना देशातील अंतर्गत अस्वस्थता दर्शवते. गाझा सीमेवरील परिस्थिती गंभीर असून, सरकार व लष्कराने लोकांच्या सुरक्षेचे विश्वासार्ह उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.