शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपल्यानंतर इस्त्राईलने आज गाझा पट्टीत येणारी सर्व मदत थांबविली आहे. शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी वाढविण्याचा नवा प्रस्ताव हमासने मान्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही इस्राईलने दिला आहे. हमासने मात्र इस्त्राईलवर टीका केली असून मदत रोखण्याची कृती म्हणजे खंडणीखोरी आणि युद्धगुन्हा असल्याचा आरोप केला आहे.
शस्त्रसंधीचा पहिला टप्पा शनिवारी (ता.१) संपला असला तरी याच टप्प्याचा कालावधी वाढविण्याबाबत चर्चा सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी पहिला टप्पा संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. दुसऱ्या टप्प्यात हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या उर्वरित अपहतांची सुटका करणार असून त्याबदल्यात इस्राईल सैन्यमाघारी घेणार आहे. मात्र, या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठीची चर्चाही सुरू झालेली नाही. यापार्श्वभूमीवर इस्त्राईलने आज इजिप्तमार्गे गाझा पट्टीत येणारे मदतसाहित्याचे शेकडो ट्रक सीमेवरच रोखले आहेत. हा निर्णय अमेरिकेशी चर्चेनंतरच घेतल्याचे इस्त्राईलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रमजानचा महिना सुरू झाला असल्याने शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी वाढवावा आणि त्याअंतर्गत पहिल्याच दिवशी निम्म्या अपहृतांची सुटका करावी, असा प्रस्ताव अमेरिकेचे पश्चिम आशियातील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी ठेवला आहे. हा प्रस्ताव इस्त्राईलला मान्य असून हमासनेही तो मान्य करावा, असे इस्त्राईलचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यातील अडथळे
शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्यात हमासने त्यांच्या ताब्यातील अपहृतांपैकी २५ जणांची सुटका केली असून मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांचे मृतदेहही इस्त्राईलकडे सुपूर्द केले आहेत. त्याबदल्यात इस्त्राईलने त्यांनी दोन हजार पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली आहे. मात्र, या सहा आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शस्त्रसंधी भंगाचा आरोप ठेवत तणाव निर्माण केला होता. इस्त्राईलने काही वेळा केलेल्या हवाई हल्ल्यात १५ ते २० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. तर, इस्त्राईलने मदतसाहित्याच्या पुरवठ्यात अडथळे आणत कराराचा भंग केल्याचे हमासचे म्हणणे आहे.