गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये सातत्याने हल्ले करणाऱ्या इस्राईलने आपला मोर्चा आता सीरियाकडे वळविला आहे. सीरियात इस्राईलच्या हवाई दलाने तुफान बॉम्ब हल्ले केल्याची माहिती सीरियातील युद्ध निरीक्षकांनी दिली. इस्राईलचे सैनिक सीरियात बरेच आतमध्ये शिरल्याने हल्ले केल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र इस्राईलचे सैन्य दमास्कसच्या दिशेने जात असल्याचा दावा इस्राईलच्या अधिकाऱ्यांनी फेटाळला.
राजधानी दमास्कस येथे पत्रकारांनी रात्रभर आणि मंगळवारी सकाळी शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ल्याचे आवाज ऐकले. ऑनलाइनवर व्हायरल झालेल्या छायाचित्रात नष्ट झालेले क्षेपणास्त्र लॉंचर, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने दिसत आहेत.
दरम्यान, या हल्ल्याबद्दल बंडखोर गट हयात तहरीर अल शाम म्हणजेच एचटीएसच्या नेत्यांनी कोणतिही तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. या गटाने सीरियाचा बहुतांश भाग ताब्यात घेतलेला आहे. एचटीएस सैनिकांच्या कारवाईमुळे सुमारे चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धाचा अंत झाला आणि असाद कुटुंबीयाला देश सोडून पळून जावे लागले. पुढची वाटचाल कशी राहिल, यावर सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, असाद सत्तेतून गेल्याने राजधानीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असाद देश सोडून गेले असून त्यांना रशियात राजकीय आश्रय मिळाला आहे. सीरियाच्या सेंट्रल बँकेच्या निर्देशानुसार खासगी बँका सुरू झाल्या आहेत. बँक कर्मचारी सादी अहमद हे अब्बू रुम्मानेह भागातील बँकेचे शाखाधिकारी असून सर्व कर्मचारी कामावर परतल्याचे सांगितले. शहरातील प्राचीन भाग हमीदियाह बाजार पुन्हा गजबजला आहे.
बाजारात शस्त्रधारी नागरिक तसेच सामान्य नागरिक अत्तर आणि आईस्क्रीमसारख्या गोष्टी खरेदी करताना दिसत आहेत. यावेळी एका विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की विक्रेत्यांना आता सुरक्षा अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागणार नाही. बकदाश नावाचे एका प्रसिद्ध आइस्क्रीम दुकानाबाहेर एक पोस्टर लावले असून त्यात ‘स्वतंत्र सीरियात बंडखोरांचे स्वागत आहे’, ‘स्वतंत्र सीरिया चिरायू होवो’, अशा घोषणा लिहलेल्या आहेत.
दमास्कस आता पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले असल्याची प्रतिक्रिया बाजारात खरेदी करणाऱ्या मैसून कुराबी यांनी दिली. या शहराचा एक आत्मा आहे आणि नागरिक आता स्वत:ला सुरक्षित समजत आहेत, असे त्या म्हणाल्या. असाद यांच्या राजवटीत नागरिक व्याकूळ झाले हेाते आणि भितीखाली वावरत होते. त्यांचे सरकार खंबीर असल्याने सामान्यांना हालचाल करता येत नव्हती, असे त्या म्हणाल्या.
इस्राईलने घुसखोरी केल्याचा दावा
असाद याच्या पतनानंतर इस्राईलचे सैनिक सीरियात सुमारे ४०० किलोमीटर आत बफर झोनमध्ये शिरले आहेत. या बफर झोनची निर्मिती १९७३ च्या पश्चिम आशियातील युद्धानंतर करण्यात आली हेाती. सीरियाच्या नागरिकांवरील हल्ले रोखण्यासाठी बफर झोन तयार करण्यात आला होता, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
इस्राईलने दिलेल्या निवेदनानुसार, सीरियातील संवेदनशील रासायनिक शस्त्र आणि स्फोटकांच्या साठ्यावर हल्ला केला जात आहे. बंडखोरांच्या हाती शस्त्रे लागणार नाहीत, यासाठी हल्ले करत असल्याचे इस्राईलने सांगितले. ब्रिटन येथील सीरियन मानवी हक्काचे निरीक्षकाने सीरियात इस्राईलने तीनशेहून अधिक हल्ले केल्याचे म्हटले आहे.
निरीक्षक आणि बैरूत येथील मायादिन टीव्हीच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, इस्राईलचे सैनिक लेबनॉनलगतच्या सीरियाच्या सीमाभागात घुसखोरी करत आहेत आणि दमास्कसपासून २५ किलोमीटर अंतरावर आहेत. मात्र, इस्राईल सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी दमास्कसकडे इस्राईलचे रणगाडे जात असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.
या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. इस्राईलचे सैनिक इस्राईलच्या संरक्षणासाठीच्या बफर झोनमध्ये असल्याचे नमूद केले. दरम्यान, इस्राईलचे हवाई दल सीरियातील सैनिकी तळ योग्य रीतीने नष्ट करत असून, यानुसार नव्याने देशाची कमान सांभाळणाऱ्या नेत्याला त्याची पुनर्उभारणी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter