इस्राईलच्या नाकेबंदीमुळे गाझात मदत पोहचवणे अशक्य - अँटोनियो गुटेरेस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत गाझातील परिस्थितीवर बोलताना सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस
संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत गाझातील परिस्थितीवर बोलताना सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस

 

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझा पट्टीवर इस्राईलने केलेल्या नाकेबंदीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आणि यामुळे गाझात भीषण मानवी संकट निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

गाझात महिनाभरापासून मदत बंद
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात बोलताना गुटेरेस म्हणाले, "गेल्या एका महिन्याहून अधिक काळ गाझात काहीच मदत पोहोचलेली नाही. मदत पूर्णपणे थांबल्याने गाझात भीषण मानवीय संकट आहे. गाझा हा आता मृत्यूचं मैदान बनलं आहे. गाझातील नागरिकांचा अन्न आणि पाण्याविना मृत्यू होत आहे." 

गाझात हल्ले सुरूच
गाझावर गेल्या बुधवारीही हल्ला झाला आहे. गाझा शहराच्या पूर्वेकडील शेजैया भागात झालेल्या हवाई हल्ल्यात किमान २३ जण ठार झाले. यामध्ये ८  महिला आणि ८  मुलांचा समावेश आहे. याशिवाय ६० हून अधिक जण जखमी झाले. या भागातील एक निवासी इमारत उद्ध्वस्त झाल्याचं स्थानिक फुटेजमधून दिसत आहे. इस्राईल संरक्षण दलाने (IDF) हा हल्ला हमासच्या एका वरिष्ठ दहशतवाद्यावर केल्याचा दावा केला. 

रुग्णालयांवर वाढता ताण
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, सातत्याने होणाऱ्या मोठ्या दुर्घटना आणि हल्ल्यांमुळे रुग्णालयांवर प्रचंड दबाव आहे. औषधं आणि इतर आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे रुग्णालयं चालवणं कठीण झालं आहे. इस्राईलने दोन  मार्चपासून गाझात सर्व प्रकारच्या मदतीवर बंदी घातली आहे. हमासने बंधक म्हणून ताब्यात घेतलेल्या उर्वरित व्यक्तींची सुटका होईपर्यंत युद्धग्रस्त गाझात कोणतीही मदत पोहोचू देणार नाही असं इस्राईलचं म्हणणं आहे.

गाझातील मानवी संकट वाढत आहे. इस्राईलच्या नाकेबंदीमुळे लाखो नागरिक अन्न, पाणी आणि औषधांशिवाय तडफडत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांनी ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीही इस्राईलच्या कारवायांवर आळा घालण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय अपयशी ठरत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter