इस्राईलचे गाझातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 h ago
स्थलांतर करताना गाझातील नागरिक.
स्थलांतर करताना गाझातील नागरिक.

 

इस्राईलच्या लष्कराने उत्तर गाझा पट्टीतील अनेक भागांतील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. इस्राईलच्या म्हणण्यानुसार, पॅलेस्टाईन भागातून रॉकेट हल्ले झाल्याने ही कारवाई करावी लागत आहे. लष्करी प्रवक्ते अविचाय अड्राई यांनी बुधवारी एका निवेदनात सांगितले की, "उत्तर गाझातील रहिवाशांनी तातडीने गाझा शहरातील पश्चिमेकडील निवाऱ्यांमध्ये जावे.काही दहशतवादी संघटना नागरिकांमध्येच लपून हल्ले करत आहेत. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे." 

रॉकेट हल्ल्यांमुळे इस्राईल सतर्क
काल सकाळी इस्राईलच्या लष्कराने सांगितले की, “आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तर गाझातून डागलेली दोन रॉकेट्स हवेतच नष्ट केली. या हल्ल्यांमुळे गाझाच्या सीमेलगत असलेल्या इस्राईली वसाहतींमध्ये सायरन वाजले आणि स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. या घटनेनंतर इस्राईलने दक्षिण गाझावरही आपली पकड मजबूत केली आहे.”

दक्षिण गाझात नवीन सुरक्षा कॉरिडॉर
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण गाझामध्ये भूभागाचा विस्तार करण्याची घोषणा केली. त्यांनी एका व्हिडिओत म्हटले, “इस्राईलच्या सैन्याने खान युनिस आणि राफा या शहरांदरम्यानचा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. हा भाग दुसरा फिलाडेल्फी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर  गाझा आणि इजिप्तच्या सीमेवर असलेल्या बफर झोनसारखा असेल. आम्ही दहशतवाद्यांवर हल्ले करत राहू आणि त्यांची पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू.” 

दरम्यान, इस्राईलच्या संरक्षण दलाने (IDF) सिरियातील काही ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती दिली. सिरियातील होम्स आणि हमा येथील लष्करी तळ आणि दमास्कसजवळील काही पायाभूत सुविधा नष्ट करणे हे या हल्ल्याचे उद्दिष्ट होते. इस्राईलने या हल्ल्यांना इस्रायली नागरिकांवरील धोक्याला प्रतिसाद असल्याचे म्हटले आहे. सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने (SANA) सांगितले की, हमा येथील विमानतळ आणि दमास्कसच्या बार्झे परिसरातील एका संशोधन केंद्राजवळ हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे सिरियातील परिस्थितीही चिघळण्याची शक्यता आहे.

इस्राईलने १८ मार्चपासून गाझामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले  सुरू केले आहेत. या काळात अन्न आणि इंधनाचा पुरवठा बंद झाल्याने गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. हमासच्या नियंत्रणाखालील गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये १,०६६ पॅलेस्टाईन मारले गेले आणि २,५९७ जण जखमी झाले. ऑक्टोबर २०२३ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ५०,४२३ पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला असून १,१४,६३८ जण जखमी झाले आहेत.  

उत्तर गाझातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश मिळाले असले, तरी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. गाझा शहरातील पश्चिमेकडील निवारेही सुरक्षित नाहीत, असे अनेकांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांत अनेकदा स्थलांतर करावे लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांचा तीव्र अभाव असल्याने त्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, तातडीने मानवीय मदत पोहोचवण्याची मागणी केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter