इस्रायल हमासचा खात्मा करण्याच्या अंतिम टप्प्यात : बेन्जामिन नेतान्याहू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आम्ही गाझा पट्टीतील हमासचा खात्मा करण्याच्या 'अंतिम टप्प्यात' आलो असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या कार्यालयाने याविषयीचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयातील कॅडेट्ससोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी सोमवारी हमासच्या निर्मूलनाच्या दिशेने प्रगती करत असल्याचा दावा केला आहे. 

नेतन्याहू यांनी गाझा विभागाचा दौरा केला. सोबतच संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि लष्कराच्या वरिष्ठ कमांडर यांच्यासमवेत नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाविषयी चर्चा केली. रफाहमधील लढाईवर भर द्यायला हवा आणि हमासवर आणखी दबाव आणायला हवा, असे या बैठकीतून निष्कर्ष निघाल्याचे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

सोमवारी, इस्रायल संरक्षण दलाने पूर्वेकडील खान युनिसमधून नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे आदेश दिले. इस्रायली सैन्य लवकरच दक्षिणी गाझान शहरात पुन्हा हल्ले सुरू करेल असा अंदाज त्यामुळे व्यक्त केला जात आहे. या भागात हमास पुन्हा एकत्र आल्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी ही आखणी केल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने एप्रिलच्या सुरुवातीस खान युनिसमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला  केला आणि त्यानंतर आपले बहुतेक सैन्य मागे घेतले होते.