अखेर इस्त्रायलच्या युद्धविरामाच्या कराराला मंजुरी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

१५ महिन्यांपासून सुरु असलेले इस्त्रायल-हमास युद्ध आता थांबणार आहे. इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटची शुक्रवारी बैठक झाली त्यात युद्ध विरामाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. तसेच पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाने ओलिसांची सुटका आणि हमाससह युद्धविरामाच्या करारास मान्यता दिली आहे. तसेच सरकारला हा करार स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सामंजस्य करार पुढे नेत असताना अखेरच्या क्षणी हमासमुळे काही अडचणी आल्या. मात्र आम्ही प्रयत्नांनी हा करार पूर्ण केला.”

सामंजस्य कराराला अर्थमंत्र्यांचा विरोध
युद्धविरामासंबंधीचा सामंज्यस करार आता इस्रायलच्या केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. या कराराला कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. नेतन्याहू सरकार या करारावर शिक्कामोर्तब करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रविवारपासून सीमाभागात युद्धविराम घोषित होऊ शकतो. मात्र, इस्रायलमधील टोकाची उजवी विचारसरणी असलेल्या उजव्या आघाडीतील पक्ष व नेत्यांनी या कराराचा कडाडून विरोध केला आहे. 

इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच व राष्ट्रीय संरक्षण मंत्री इटामार बेनगुइरे यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या युद्धविराम कराराच्या विरोधात मतदान केलं आहे. परंतु, ते अल्पमतात असल्यामुळे नेतन्याहू सरकारला हा करार पुढे नेता आला.

कतारचे राष्ट्राध्यक्ष कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान यांची प्रतिक्रिया 
हमास, इस्रायल, कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींनी युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये भाग घेतला होता. त्यांना यश आल्याचे १५ जानेवारी रोजी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी जाहीर केले. अजून तांत्रिक बाबींची पूर्तता होत आहे. पण १९ जानेवारीपासून ४२ दिवसांच्या युद्धविरामास सुरुवात होईल, असे अल थानी यांनी स्पष्ट केले. यासंबंधी प्रस्तावास इस्रायलचा मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. काही बाबींवर अजूनही स्पष्टता नसल्याचे इस्रायलच्या प्रतिनिधींनी सांगितले.