उत्तर गाझापट्टीत इस्राईलचा बाँबवर्षाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
शेख नईम कासीम
शेख नईम कासीम

 

उत्तर गाझा पट्टीवर मागील तीन आठवड्यांपासून जोरदार मारा करणाऱ्या इस्त्राईलने आज केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक पाच मजली इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीमध्ये निर्वासित झालेल्या अनेक पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला होता. ही इमारत कोसळल्याने आणि स्फोटामुळे किमान ६० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

इस्राईलने काही आठवड्यांपासून लेबनॉनमधील हिज्बुल्ला संघटनेला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य बनविले आहे. मात्र तरीही गाझा पट्टीतील हल्ले कमी झालेले नाहीत. विशेषतः उत्तर गाझा पट्टीमध्ये बाँबफेक केली जात आहे. या भागातील बहुतांश नागरिक दक्षिण गाझा पट्टीत विस्थापित झाले असले तरी अनेक गावांमध्ये काही नागरिक अजूनही राहात आहेत. या नागरिकांवरही निघून जाण्यासाठी दडपण आणले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये इस्राईलच्या हल्ल्यात या भागातील शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजही इस्त्राईलने बैत लाहिया गावावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील एक क्षेपणास्त्र एका पाच मजली इमारतीवर कोसळले. या इमारतीमध्ये शंभरहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक होते. या हल्ल्यामुळे इमारत कोसळून १२ महिला आणि २० मुलांसह एकूण ६० जणांचा मृत्यू झाला. १७ जण बेपत्ता आहेत.

रुग्णालयांत डॉक्टरच नाहीत
इस्त्राईलचे रोजच हल्ले होत असून हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयांपर्यंत पोहोचविणे, हे देखील जिकिरीचे झाले आहे. जे रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहोचत आहेत, तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये कोणतीही सेवा उपलब्ध नसून उपचार करण्यासाठी डॉक्टरही नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

शेख नईम कासीम नवा म्होरक्या
इस्त्राईलकडून लेबनॉनमध्ये दहशतवादी हिज्बुल्ला संघटनेचे कंबरडे मोडले जात असताना सोमवारी संघटनेच्या नव्या म्होरक्याची घोषणा करण्यात आली. हसन नसरल्लाचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर नव्या प्रमुखाची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाचा नेता शेख नईम कासीम याच्यावर संघटनेची जबाबदारी सोपविली आहे. हिज्बुल्लाने जारी केलेल्या निवेदनात कासीमला या पदावर नेमल्याचे म्हटले आहे. कासीमने संघटनेचे ध्येय तडीस नेण्याचे नेहमीच प्रयत्न केले आहेत आणि ईश्वर त्याला त्याच्या मोहिमेत यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल, असे निवेदनात म्हटले आहे. 

कासीम हा हिज्बुल्ला संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. नसरल्लाच्या मृत्यूनंतर कासीमने लेबनॉनच्या जनतेला उद्देशून भाषण केले होते. यूएईच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कासीम सध्या इराणमध्ये आहे. कासीमने इराणच्या मदतीने ५ ऑक्टोबर रोजी बैरूत सोडले होते. इराणचे परराष्ट्र मंत्री त्याला नेण्यासाठी विमान घेऊन आले होते. इस्त्राईलच्या भीतीने कासीमला तेथून काढण्याचे आदेश इराणच्या नेत्यांनी दिले आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात आली, असे माध्यमात म्हटले आहे.

नईमच्या अगोदर हाशेम सैफिद्दीनचे नाव घेतले जात होते. तो नसरल्लाचा मामेभाऊ होता. मात्र इस्त्राईलच्या हल्ल्यात तोही मारला गेला. त्याच्या मृत्यूला इस्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी दुजोरा दिला. कासीमचा जन्म १९५३ मध्ये लेबनॉनच्या कफार किला गावात झाला होता. १९७० च्या दशकात कासीम हा लेबनॉनमध्ये शियांच्या हक्कासंदर्भातील आंदोलनात सहभागी झाला होता. १९८० च्या दशकांच्या प्रारंभी कासीम हा हिज्बुल्लाशी जोडला गेला आणि संस्थापक सदस्यांत त्याचा समावेश केला. कासीम अनेक दशकांपासून धार्मिक शिक्षण देत होता.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter