इराणी जनतेचे सुधारणावादाला पाठबळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

इराणच्या अध्यक्षपदी सुधारणावादी नेते डॉ. मसूद पेझेश्‍कियान यांची निवड झाली. त्यांनी ३० दशलक्ष मतांपैकी ५४ टक्के मते मिळवून सर्वाधिक मते मिळविली. पेझेश्‍कियान यांच्या नेतृत्वात प्रागतिक विचारांना आणि त्यानुसार सुधारणात्मक धोरणांना चालना मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

कट्टरपंथीय ‘सुप्रीम लीडर’ची त्यांना कितपत साथ मिळते, यावर सुधारणांची गती अवलंबून राहील. तरीही या निवडणुकीतील कौल ऐतिहासिक म्हणावा लागेल. जनमानस कोणत्या बाजूने झुकते आहे, याचा अंदाज या निवडणुकीतून येतो.

इराणच्या अध्यक्षपदी सुधारणावादी नेते डॉ. मसूद पेझेश्‍कियान यांची गेल्या शनिवारी (ता. ६) निवड होताच राजधानी तेहरानच्या रस्त्यावर उतरून विशेषतः तरुणांनी उत्स्फूर्त जल्लोष केला. तरुणाईबरोबरच महिलांनाही पेझेश्‍कियान यांच्या विजयाने हायसे वाटले आणि त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. पेझेश्‍कियान यांनी अनपेक्षितपणे कट्टरतावादी सईद जलीली यांचा पराभव करून जगालाच नव्हे; तर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांनाही चकित केले. साऱ्या जगात एकीकडे उजव्या विचारसरणीला बळ मिळत असताना इराणच्या जनतेने मात्र सुधारणांच्या बाजूने कौल देत राजकारणात धर्म आणू पाहणाऱ्यांना आरसाच दाखविला आहे.

इराणचे तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाल्याने ही निवडणूक झाली. या निवडणुकीत तीन कोटी मतदारांनी मतदान केले. ही संख्या जरी तुलनेने कमी असली तरीही इराणचे जगातील भूराजकीय महत्त्व लक्षात घेता या निकालाला जागतिक राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणूक प्रचारात पेझेश्‍कियान यांनी पाश्‍चिमात्य देशांशी चांगला संबंध आणि देशातील अनेक वर्षांपासूनचा हिजाब कायदा सुटसुटीत करण्याचे आश्‍वासन दिले होते. नेमकी हीच बाब कट्टरतावादी खामेनी यांना न पटणारी होती. त्यामुळे त्यांनी पुराणमतवादी उमेदवार सईद जलीली यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तरीही इराणी जनतेने कोणत्याही दबावाला न झुगारता सुधारणेच्या दिशेने मतदान केले. दैनंदिन जीवन महत्त्वाचे असून, ते जो सुखकर करेल त्याच्या पाठीशी जनता उभी राहते, हे नागरिकांनी दाखवून दिले. या निकालामुळे इराणमध्ये सुधारणांचे वारे सुरू राहण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे.

वाढती गरिबी आणि महागाई
अमेरिका व पाश्‍चात्त्य देशांच्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था सध्या कमालीची खालावली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीणे हराम झाले आहे. महागाईच्या दरात तब्बल ४० टक्के वाढ झाल्याने महिलांना संसाराचा गाडा हाकताना नाकीनऊ येत आहेत. वाढत्या महागाईमुळे गरिबांची संख्या देशात प्रचंड प्रमाणात वाढू लागली. केवळ अमेरिकेला शत्रू ठरवून पोट भरत नाही, ही बाब पेझेश्‍कियान यांनी वेळीच ओळखली आणि त्यांनी अमेरिकेबरोबर बासनात गुंडाळल्या गेलेल्या आण्विक कराराचे पुनरुज्जीवन करून जगाची आर्थिक बंधने दूर करण्याचे आश्वासन प्रचारात दिले. खामेनींसह पुराणमतवाद्यांचा याला अर्थातच कडाडून विरोध आहे. मात्र त्याची तमा पेझेश्‍कियान यांनी बाळगली नाही. स्वतःला पिंजऱ्यात घालून सध्याच्या जगात प्रगती साधता येणार नाही, तरुणांच्या हाताला काम देता येणार नाही, हा त्यांचा युक्तिवाद तरुणाईला भावला. त्यामुळे तरुण व मध्यवर्गीय मतदारांनी त्यांना भरघोस मतदान केले.

२०१५ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा व इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दोन देशांत ऐतिहासिक आण्विक करार केला होता. यामुळे अमेरिका व पाश्‍चात्त्य देशांनी इराणला मदत सुरू केली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होताच त्यांनी हा करार थांबवून इराणवर आर्थिक निर्बंध लादले. तेव्हापासून इराणची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. शिवाय आखतातही ताणतणाव वाढू लागला. रुहानी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पेझेश्‍कियान आता अध्यक्ष बनले असून ते आता निर्बंध उठवण्यासाठी पुढाकार घेण्याची चिन्हे आहेत.

महिलांचा वाढता पाठिंबा
पेशाने सर्जन असलेले पेझेश्‍कियान हे कुटुंबवत्सल आहेत. १९९० मध्ये त्यांच्या पत्नी व एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगानंतर पेझेश्‍कियान यांनी दुसरा विवाह न करता दोन मुलगे व एका मुलीला वाढविले. एक कुटुंबवत्सल राजकारणी अशी त्यांची जनतेच्या मनात प्रतिमा आहे. त्यातच त्यांनी कायमच महिलांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका घेतली. वेष परिधान करणाऱ्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी महसा अमिनी या महिलेला पोलिसांनी २०२२ मध्ये अटक केली होती. पोलिस कोठडीतच तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने इराणी जनता रस्त्यावर उतरली होती. अशा कठीण प्रसंगात बहुतांश नेत्यांनी सत्तेची बाजू घेतली होती. पण पेझेश्‍कियान यांनी महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांना कडक शासन करण्याची जाहीर मागणी केली होती. त्याचप्रमाणे हिजाबसंबंधीच्या कठोर कायद्याविरोधात जाहीर भूमिका घेत विजयी झाल्यास हा कायदा सुलभ करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळेच सुशिक्षित, तरुण महिलांनी पेझेश्‍कियान यांच्यावर मोठा विश्वास टाकत त्यांना मतदान केले. आता हे कायदे सुलभ करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

राजकीय व्यवस्था, न्यायपालिका, प्रशासन या सर्वच ठिकाणी जिथे धर्मसंप्रदायाचे प्राबल्य असते, तिथे सुधारणावादी अध्यक्षाच्या निवडीचे महत्त्व प्रामुख्याने प्रतीकात्मक राहते. तिथे सर्वोच्च अधिकार ‘सुप्रिम लीडर’कडे असतात आणि या पदावर धार्मिक व्यक्ती असते. सध्या खामेनी या पदावर आहेत. जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते खामेनी यांच्या संमतीनेच घ्यावे लागणार आहेत. हे सगळे खरे असले तरीदेखील इराणमधील अध्यक्षीय निवडणुकीतील डॉ. मसूद पेझेश्कियान यांना अध्यक्षीय निवडणुकीत मिळालेल्या यशाची नोंद घ्यायला लागेल. जनमानसात काय खदखदतेय, लोकांच्या आकांक्षा काय आहेत, याची प्रचिती अशा निवडणुकांच्या माध्यमातून येत असते. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करताना पेझेश्‍कियान यांना अनेक दिव्यातून जावे लागणार आहे. खामेनींशी जुळवून घेत योग्य तो मार्ग काढत अमेरिकेसमवेत संबंध सुधारण्याचे प्रयत्न पेझेश्‍कियान यांना करावे लागणार आहेत. तरच नागरिकांना चार दिवस सुखाचे येणार आहेत. एक मात्र नक्की की, पेझेश्‍कियान यांचा विजय हा आखाती देशा तील सुधारणावाद्यांसाठी ओॲसिस ठरणार आहे.

 
 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter