इराणच्या अध्यक्षपदासाठी मतदान संपन्न

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मागील महिन्यात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाल्यानंतर इराणमध्ये अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानंतर काल त्याठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सहा कोटी दहा लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती समोर आली.

अध्यक्षपदासाठी सुरूवातीला सहा नावांची चर्चा होती पण अखेरच्या क्षणी उपराष्ट्रपती आमीर हुसैन काजीजादेह हाशमी, तेहरानचे महापौर अली रझा जकानी यांनी त्यांची नावे माघारी घेतली आहेत. आता या रेसमध्ये केवळ एकूण चार उमेदवार निवडणूक लढवत असून त्यात मोहंमद बाकर कालीबाफ, सईद जलिली, मुस्तफा पोरमोहंमदी आणि मसूद पेजेशकियान यांच्या नावांचा समावेश आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनेई यांनीही मतदानाचा अधिकार बजावतानाच लोकांना देखील मतदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. इराणमध्ये जो उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवितो त्याला विजयी घोषित करण्यात येते. एखाद्या उमेदवाराला एवढी मते मिळाली नाही तर पुन्हा निवडणूक घेण्यात येते. यासाठी पाच जुलैला पुन्हा मतदान होणे अपेक्षित आहे. निकालानंतर सर्वोच्च धार्मिक नेते आयातोल्लाह खामेनेई त्यांना मान्यता देतात.

प्रक्रिया लांबू शकते
गाझामध्ये इस्राईलच्या लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये होत असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी देशभर ५८ हजार ६४० एवढी मतदान केंद्रे उभारण्यात आली असून या मतदान केंद्रांसाठी प्रामुख्याने शाळा आणि मशिदींची निवड करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहू शकते असे सांगण्यात आले.