अमेरिकेसोबत ऐतिहासिक अणुकरारासाठी इराण उत्सुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली ख़मेनेई
डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली ख़मेनेई

 

इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही देश आज ओमानची राजधानी मस्कत येथे अणुकरारासाठी चर्चा करणार आहेत. ही चर्चा ‘अप्रत्यक्ष’ स्वरूपाची असेल, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघी यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही वाटाघाटी ‘थेट’ होतील, असा दावा केला आहे. या चर्चेपूर्वी अमेरिकेने इराणवर ‘कमाल दबाव’ धोरण कायम ठेवत इराणच्या तेल नेटवर्क आणि अणुकार्यक्रमावर नवे निर्बंध लादले आहेत.

इराणची भूमिका 
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी काल सांगितले की, “अमेरिकेच्या आक्रमक धोरण आणि धमक्यांनंतरही इराण मुत्सद्देगिरीला खरी संधी देण्यास तयार आहे. आम्ही पूर्ण सावधगिरी आणि प्रामाणिकपणे ही चर्चा करत आहोत. अमेरिकेने आमच्या या निर्णयाचा आदर करावा.  इराण या बैठकीत अमेरिकेच्या हेतू आणि गांभीर्याची चाचपणी करेल आणि त्यानुसार पुढील पावले उचलेल.” 

अमेरिकेचे धोरण 
अमेरिकेने इराणवर निर्बंधांचा दबाव कायम ठेवला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी सांगितले की, “ही चर्चा यशस्वी झाली नाही, तर इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणार. याला प्रत्युत्तर देताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार अली शमखानी यांनी गुरुवारी इशारा दिला की, अशा धमक्यांमुळे इराण संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांना देशातून हाकलून देऊ शकते. यावर अमेरिकेने म्हटले की, असा निर्णय इराणसाठी चुकीचा ठरेल.

चर्चेची पार्श्वभूमी
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी खामेनी यांना पत्र पाठवून वाटाघाटीची विनंती केली होती. तसेच नकार दिल्यास लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. काही आठवड्यांनंतर इराणने अप्रत्यक्ष वाटाघाटींसाठी तयारी दर्शवली, पण अमेरिकेचे ‘कमाल दबाव’ धोरण सुरू असताना थेट चर्चा शक्य नसल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अराघी हे चर्चेचे नेतृत्व करतील.

कशी असेल चर्चा?
७ एप्रिलला ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चेची घोषणा केली होती. मात्र, इराणने थेट वाटाघाटी नाकारत ‘अप्रत्यक्ष’ मार्ग स्वीकारला आहे. याचा अर्थ दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकमेकांशी थेट बोलणार नाहीत, तर ओमानसारख्या तटस्थ देशाच्या मध्यस्थीने संवाद साधतील. इराणने या चर्चेच्या निकालाबाबत कोणताही अंदाज बांधण्यास नकार दिला आहे. याविषयी बकाई यांनी सांगितले की,  “आम्ही पूर्वग्रहदूषित नाही किंवा भाकीत करत नाही. आम्ही फक्त अमेरिकेच्या हेतूंची पडताळणी करत आहे.” 

इराण आणि अमेरिका यांच्यातील ही चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढतच आहे. अमेरिकेचे एकीकडे निर्बंध आणि लष्करी धमकी, तर दुसरीकडे चर्चेची तयारी हे परस्परविरोधी धोरण दिसते. इराणनेही सावध पवित्रा घेत मुत्सद्देगिरीला संधी दिली आहे. पण त्यांचा अविश्वास स्पष्ट आहे. या चर्चेतून अणुकराराचा मार्ग सापडला, तर मध्यपूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो. मात्र, ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे आणि इराणच्या कडव्या भूमिकेमुळे यशाची शक्यता कमी आहे.