सीरियाचे अध्यक्ष बाशर असाद यांची राजवट स्थानिक बंडखोरांनी उलथून टाकल्यानंतर तिथे सध्या अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे अडकून पडलेल्या ७५ नागरिकांची भारतीय अधिकाऱ्यांनी सुखरूप सुटका केली आहे. बैरूत आणि दमास्कस येथील दूतावासाच्या समन्वयाने ही मोहीम पार पडली. त्यामध्ये लेबनॉनमध्ये भारताचे राजदूत असणाऱ्या नूर रहमान शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
येथील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सगळ्या भारतीय नागरिकांनी लेबनॉनची सीमा ओलांडली असून त्यांना घेऊन येणारे विमान लवकरच भारतामध्ये उतरेल असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य असेल.
सध्या सीरियात जे भारतीय नागरिक अडकून पडले आहेत त्यांना स्थानिक दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे देखील येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. बाशर असाद यांनी येथून पळ काढल्यानंतर थेट रशियामध्ये आश्रय घेतला होता.