भारतीयांचा डंका! भारतीय वंशाचे निकेश अरोरा ठरले सर्वाधिक वेतन घेणारे CEO

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 3 Months ago
निकेश अरोरा
निकेश अरोरा

 

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत असेलल्या आणि सर्वाधिक वेतन घेणाऱ्या १० सीईओंची (मुख्य कार्यकारी अधिकारी) माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वोच्च दहा जणांच्या यादीत केवळ एका भारतीय वंशाच्या नागरिकाचा समावेश आहे. आपण सिलिकॉन व्हॅलीमधील सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांना ओळखतो. पण या दोघांपेक्षाही आणखी एक भारतीय वंशाचा सीईओ सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीत आला आहे. त्यांचे नाव निकेश अरोरा असून ते पालो अल्टो नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘सी-स्यूट कॉम्प’ या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने सोमवारी सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंची यादी जाहिर केली.

‘सी-स्यूट कॉम्प’ या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने जाहीर केलेल्या सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचा समावेश आहे. ‘सी-स्यूट कॉम्प’ने २०२३ मधील जाहीर वेतन आणि प्रत्यक्षात मिळालेले वेतन अशा दोन निकषांवर आधारित दोन याद्या जाहीर केल्या असून, यातील एकाही यादीत गुगलचे सीईओ आणि भारतीय वंशाचे नागरिक सुंदर पिचाई यांचे नाव नाही. मात्र मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांचे नाव या दोन्ही यादीत समाविष्ट आहे; तर निकेश अरोरा यांचा दोन्ही याद्यांमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश आहे. अरोरा यांना २०२३ मध्ये १५.१४ कोटी डॉलर वेतन जाहीर करण्यात आले होते. यानुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर प्रत्यक्षात त्यांना २६.६४ कोटी डॉलर मिळाले आहेत. यानुसार तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत ते दहाव्या क्रमाकांवर आहेत. प्रत्यक्षात मिळालेल्या कमाईच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांनी २०२३ मध्ये १.४ अब्ज डॉलरची कमाई केली. त्यांच्यानंतर एक अब्जाहून अधिक डॉलरची कमाई करणारे पॅलांटीर टेक्नॉलॉजीजचे अलेक्झांडर कार्प हे दुसरे व्यक्ती आहेत.

निकेश अरोरा कोण आहेत?
निकेश अरोरा यांनी २०१८ साली पालो अल्टो नेटवर्क्सची कमान आपल्या हाती घेतली. त्याआधी त्यांनी गुगल आणि सॉफ्टबँक ग्रुपमध्येही काम केले होते. निकेश अरोरा (५६) यांचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. निकेश यांनी दिल्लीच्या हवाई दल पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. तसेच नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून एमबीए तर बोस्टन कॉलेजमधून त्यांनी एमएससीचीही पदवी मिळवलेली आहे.
गुगलमध्ये अरोरा यांनी १० वर्ष वरिष्ठ पदावर सेवा दिली. २०१४ साली त्यांनी राजीनामा देऊन सॉफ्टबँक ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.