सौदी अरेबियाने भारताच्या विनंतीनंतर हज यात्रेसाठी नुसूक हज पोर्टल पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १०, ००० भारतीय हज यात्रेकरूंना मिनामध्ये जागा मिळणार आहे. भारताच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या मध्यस्थीमुळे हा निर्णय घेण्यात आला. यंदा खासगी टूर ऑपरेटर्सनी सौदीच्या नियमांचं पालन न केल्याने ५२, ००० हज यात्रेच्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सौदीचा हज पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतीय यात्रेकरूंना मोठा दिलासा देणारा आहे.
काय आहे प्रकरण?
भारतासाठी यंदा सौदी अरेबियाने १, ७५, ०२५ हज यात्रेकरूंचा कोटा निश्चित केला आहे. यापैकी १, २२, ५१८ यात्रेकरूंची व्यवस्था भारताच्या हज समितीमार्फत केली जाते. उरलेला कोटा खासगी टूर ऑपरेटर्सना दिला जातो. यंदा सौदीच्या नव्या नियमांनुसार, ८०० हून अधिक खासगी ऑपरेटर्सना एकत्र करून २६ संयुक्त हज ग्रुप ऑपरेटर्स (CHGOs) तयार करण्यात आले. अल्पसंख्याक मंत्रालयाने या २६ ऑपरेटर्सना कोटा वेळेत वाटप केला होता. पण या ऑपरेटर्सनी सौदीच्या महत्त्वाच्या मुदती पाळल्या नाहीत. मिनामधील कॅम्प, निवास आणि वाहतूक यासारख्या आवश्यक करारांना त्यांनी अंतिम स्वरूप दिलं नाही. यामुळे ५२, ००० हज यात्रेकरूंच्या जागा रद्द झाल्या.
मिनामधील आव्हानं
हज यात्रेदरम्यान मिनामध्ये काही महत्त्वाचे धार्मिक विधी पार पडतात. पण मिनामध्ये जागा मर्यादित आहे आणि उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे. सौदीच्या हज आणि उमराह मंत्रालयाने यंदा कोणत्याही देशाला मुदतवाढ देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. खासगी ऑपरेटर्सच्या विलंबामुळे मिनामधील जागा आधीच इतर देशांनी घेतल्या. पण भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सौदीने १०, ००० यात्रेकरूंसाठी नुसूक पोर्टल पुन्हा उघडण्यास मान्यता दिली. मंत्रालयाने खासगी ऑपरेटर्सना ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
याविषयी भारताच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने सांगितले की, “भारतीय मुस्लिमांना ही पवित्र यात्रा करता यावी, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. २०१४ मध्ये भारताचा हज कोटा १, ३६, ०२० होता. तो २०२५ मध्ये १, ७५, ०२५ पर्यंत वाढला आहे. हा कोटा सौदी अरेबिया हज यात्रेच्या तारखेच्या जवळपास ठरवतो. हज समितीमार्फत यात्रेकरूंसाठी विमान, वाहतूक, मिनामधील कॅम्प, निवास आणि इतर सुविधांची व्यवस्था सौदीच्या नियमांनुसार पूर्ण केली जाते. यंदा हज समितीने आपला कोटा यशस्वीपणे हाताळला, पण खासगी ऑपरेटर्सच्या चुकांमुळे अडचणी निर्माण झाल्या.”
यात्रेकरूंमध्ये नाराजी
५२, ००० हज यात्रेकरूंच्या जागा रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि इतर विरोधी पक्षांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. अनेक यात्रेकरूंनी आधीच पैसे भरले होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. उमर अब्दुल्ला यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना सौदी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही या निर्णयामुळे यात्रेकरू आणि टूर ऑपरेटर्सना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter