हज यात्रा ही इस्लाम धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. दरवर्षी लाखो मुस्लिम बांधव सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी जातात. यंदा २०२५ मध्ये हज यात्रा ४ जून ते ९ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. ही तारीख इस्लामी कॅलेंडरमधील झिल-हज महिन्याच्या चंद्रदर्शनावर अवलंबून आहे. भारतातूनही मोठ्या संख्येने हज यात्रेकरू या पवित्र यात्रेला जातात. यंदा भारतासाठी सौदी अरेबियाने १.७५ लाख हज यात्रेकरूंचा कोटा निश्चित केला आहे. यापैकी ७० टक्के यात्रेकरूंची व्यवस्था भारतातील हज समितीमार्फत होईल. तर उरलेला ३० टक्के कोटा खासगी हज ग्रुप ऑपरेटर्सना देण्यात आला आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या हज मंत्रालयाने भारतीय हज यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा काही खासगी हज ग्रुप ऑपरेटर्स सौदीच्या महत्त्वाच्या मुदती आणि नियमांचे पालन करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मिनामधील कॅम्प, निवास आणि वाहतूक यासारख्या सुविधांचे करार पूर्ण करता आले नाहीत. यामुळे जवळपास ५२,००० भारतीय हज यात्रेकरूंच्या प्रवासावर अनिश्चिततेचे सावट होते.
भारत सरकारच्या मध्यस्थीनंतर सौदी हज मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी हज (नुसूक) पोर्टल पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १०, ००० यात्रेकरूंसाठी जागा उपलब्ध होणार आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाने सर्व खासगी हज ग्रुप ऑपरेटर्सना ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत सरकारने हज यात्रेच्या तयारीसाठी खूप कष्ट घेतले आहेत. अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार आणि सहसचिव सीपीएस बक्षी यांनी नुकतीच जेद्दाहला भेट देऊन हज यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. याशिवाय, केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ११ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान सौदी अरेबियाला भेट दिली. या भेटीदरम्यान हज २०२५ साठी भारत-सौदी अरेबिया दरम्यानचा द्विपक्षीय करार झाला. तसेच, हज आणि उमराह परिषदेच्या उद्घाटन सत्रात सहभाग आणि सौदीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी पार पडल्या.
हज यात्रा ही केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर एक मोठी प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी आहे. भारतासारख्या देशातून लाखो लोकांचा हज प्रवास यशस्वी होण्यासाठी सरकार, हज समिती आणि खासगी ऑपरेटर्स यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सौदीच्या कठोर नियमांचे पालन करणे आणि यात्रेकरूंच्या सोयी-सुविधांची काळजी घेणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter