लाओस येथील गोल्डन ट्रायंगल स्पेशल इकॉनॉमिक झोन (GTSEZ) मधील सायबर घोटाळा केंद्रांमध्ये फसवले गेलेले ६७ भारतीय तरुण भारतीय दूतावासाच्या मदतीने सुटले आहेत. या तरुणांना बनावट नोकऱ्यांच्या आमिषाने फसवून तस्करीद्वारे नेण्यात आले होते. तिथे बळजबरीने काम करण्यास भाग पाडले जात होते. भारतीय दूतावासाने लाओस प्रशासनाच्या मदतीने ही सुटका केली असून, सर्व तरुणांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात आली आहे.
तस्करी आणि फसवणूक प्रकरण
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ही तरुण मंडळी भारतातून नोकरीच्या शोधात लाओसमध्ये आली होती. मात्र, बनावट नोकऱ्या देणाऱ्या दलालांनी त्यांची फसवणूक करून त्यांना सायबर घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकवले. तेथे त्यांना धमकावले जाऊन काम करण्यास भाग पाडले जात होते. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक दबाव टाकण्यात आला.
दूतावासाने सुटकेसाठी तातडीने पावले उचलली. भारतीय राजदूत प्रशांत अग्रवाल यांनी स्वतः GTSEZ येथे जाऊन लाओस प्रशासनाच्या मदतीने आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि तरुणांना विएंतिएन येथे हलवण्यात आले. त्यांच्यासाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरुणांना न्याय मिळावा यासाठी पुढील पावले
राजदूत प्रशांत अग्रवाल यांनी सुटलेल्या तरुणांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी या तरुणांना आपली फसवणूक करणाऱ्या दलालांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. लाओस प्रशासनासोबत समन्वय साधून सर्व सुटका झालेल्या व्यक्तींच्या भारतात परतीच्या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.
अशी होते फसवणूक
भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याची हमी दिली जाते. मात्र तेथे पोचल्यानंतर त्यांना थायलंड-लाओ सीमेजवळील चियांग रायपर्यंत रस्तेमार्गाने जाण्यास सांगितले जाते. हा मार्ग तस्करांच्या जाळ्यात अडकविणारा आहे. यानुसार तरुणांना लाओ-पीडिआरच्या जीटीएसईझेडमध्ये पाठविले जाते. ‘जीटीएसईझेड’ येथे गुन्हेगारी टोळ्या पारपत्र काढून घेतात आणि त्यांना परकी भाषेतील करारावर स्वाक्षऱ्या करायला भाग पाडू शकतात.
भारतीय तरुणांसाठी सावधगिरीचा इशारा
भारतीय दूतावासाने यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 924 भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यातील 857 जण सुखरूप भारतात परतले आहेत. विशेषतः थायलंडमधील चिआंग राय आणि लाओस सीमेवर जाणाऱ्या तरुणांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे. अनेक घटनांमध्ये प्रवासाच्या सुरुवातीलाच पारपत्र जप्त करून जबरदस्तीने अन्यायकारक करारावर सही घेतली जाते, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.
दूतावासाने प्रसिद्ध केली महत्त्वाची मार्गदर्शिका
या प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय दूतावासाने अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर मार्गदर्शिका प्रसिद्ध केली असून, त्यात तातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत. भारतीय तरुणांनी विदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी विश्वसनीय स्त्रोतांकडून खात्री करूनच पुढे जावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.