दुबईतील भारतीय व्यवसायीक फिरोज मर्चंट आणि दुबई चॅरिटी असोसिएशनच्या बोर्ड सदस्य खालिद अल ओलामा
दुबई स्थित भारतीय व्यवसायी फिरोज मर्चंट यांनी दुबई चॅरिटी असोसिएशनला दोन कोटींपेक्षा जास्त रुपये दान केले आहे. फिरोज हे दुबईच्या प्योर गोल्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या या देणगीचा वापर दुबई चॅरिटी असोसिएशन या संस्थेतील किडनी रुग्णांसाठीच्या डायलेसिससाठी केला जाणार आहे.
दुबई चॅरिटी असोसिएशनच्या बोर्ड सदस्य आणि महासचिव खालिद अल ओलामा यांनी यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. यावेळी त्यांनी या देणगीसाठी फिरोज यांचे आभार व्यक्त केले. या देणगीतून किडनी रुग्णांसाठी होणाऱ्या परिणामाचा उल्लेख केला.
ते म्हणाले, “ही देणगी केवळ आर्थिक योगदान नाही. हे प्योर गोल्ड ग्रुपची सामाजिक जबाबदारी आणि समुदाय कल्याणासाठीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आम्हाला या समूहाच्या सहकार्याचा अभिमान आहे. युएईतील मानवी मदतीच्या कामासाठी त्याच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत. या सहकार्यामुळे आम्हाला आरोग्य सेवा वाढवता येतात आणि रुग्णांना अधिक मदत करता येते.”
फिरोज मर्चंट यांनी याआधीही अनेक देणग्या दिल्या आहेत. दुबई चॅरिटी असोसिएशनला देणगी दिल्यानंतर फिरोज मर्चंट म्हणाले, “दुबई चॅरिटी असोसिएशनने त्यांच्या निरंतर मानवी उपक्रमांमध्ये केलेल्या समर्पणासाठी मी त्यांचे आभार मानतो. जगातील सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सर्वांना मिळाव्या तो त्यांचा मूलभूत हक्क आहे असे मी मानतो. या समाज उपयोगी कामासाठी मी काही योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे.”
फिरोज मर्चंट यांच्या सामाजिक कार्याने अनेक गरीब आणि अशक्त व्यक्तींच्या जीवनात मोठा बदल घडवला आहे. फिरोज यांच्या ‘फॉरगॉटन सोसायटी’ या उपक्रमातून २००८ पासून युएईत २०,००० पेक्षा जास्त कैद्यांची सुटका केली आहे. त्यासाठी त्यांनी कैद्यांचे कर्ज माफ करून, त्यांना त्यांच्या देशात परत जाण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था केली होती. २०२४ मध्ये त्यांनी रमजानच्या आधी ९०० कैद्यांची सुटका करण्यासाठी करोडो रुपये दिले होते.
२०१७ मध्ये त्यांनी युएईतील कैद्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्यासाठी वार्षिक १३०,७९० अमेरिकी डॉलर देण्याची घोषणा केली होती. समाजातील गरजू व्यक्तींना मदत करताना फिरोज हे सामाजिक जबाबदारीचे पालन करत आहेत. यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठीचे प्रयत्न दिसतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter