खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडे कॅनडा आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचे दुहेरी नागरिकत्व आहे. नुकतेचे तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. याच प्रकरणावर आता भारत अमेरिकासोबत चर्चा करणार आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल याविषयी माहिती देताना म्हणाले, “भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सर्व मुद्यांवर अमेरिकेसोबत चर्चा करणार आहे. जेव्हा भारतविरोधी कारवाई करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी आपण सर्व प्रकरण अमेरिकेसमोर मांडतो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारे आणि भारतविरोधी अजेंडा असलेले मुद्दे अमेरिकेसोबत चर्चा करताना मांडले जातील.”
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन झाले. प्रसंगी औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. २० जानेवारीला याठिकाणी लिबर्टी बॉलमध्ये गुरपतवंत सिंग पन्नू याला पहिले गेले. WION च्या अहवालानुसार, खलिस्तानी कार्यकर्ता गुरपतवंत सिंग पन्नू याला अधिकृतपणे आमंत्रित केले गेले नव्हते. त्याने संपर्ककरून सोहळ्याचे तिकीट मिळवले होते. यामध्ये 'यूएसए, यूएसए' अशा घोषणा देण्यात आल्या. याचवेळी पन्नूचा खलिस्तानच्या समर्थानात घोषणा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नुकतेच खासदार आणि अभिनेत्री कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविरोधात ब्रिटनमध्ये निदर्शने करण्यात आली होती. याविषयी बोलताना जयस्वाल म्हणाले, "चित्रपट गृहांमध्ये 'इमर्जन्सी'ला अडवले जात असल्याच्या अनेक घटना आम्ही पहिल्या आहेत. आम्ही ब्रिटन सरकारसोबत त्या हिंसक निदर्शनांबाबत आणि भारतविरोधी घटकांच्या धमकीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला निवडकपणे लागू करता येत नाही. या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण करणाऱ्या जमावाला जबाबदार धरले पाहिजे. आम्हाला आशा आहे की ब्रिटन सरकार संबंधित व्यक्तींविरुद्ध योग्य कारवाई करेल. भारताचे लंडनमधील उच्चायुक्त तेथील समुदायाच्या सुरक्षेसाठी त्यांच्याशी संवाद करत आहेत.”
बेकायदेशीर स्थलांतरावर बोलताना जयस्वाल म्हणाले, "भारत नेहमीच बेकायदेशीर स्थलांतराविरोधात आहे. अमेरिकेतच नाही तर जगभरात कुठेही भारतीय नागरिक योग्य कागदपत्रांशिवाय असतील किंवा जास्त दिवस राहिली असतील तर आम्ही त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करू. पडताळणी करून झाल्यानंतर संबंधित नागरिक भारतीय असतील तर आम्ही त्यांना भारतात परत येण्यास मदत करू.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter