सौदी अरेबियाचे प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ एप्रिलला सौदी अरेबियाला भेट दिली. ही मोदींची सौदी अरेबियातील तिसरी भेट होती. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी भारताला भेट देऊन जी-20 परिषदेत भाग घेतला होता. त्या वेळी भारत-सौदी अरेबिया सामरिक भागीदारी परिषदेची पहिली बैठकही झाली होती.
जेद्दाह येथील अल-सलाम पॅलेसमध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी मोदींचं स्वागत केलं. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील दृढ मैत्रीचा उल्लेख त्यांनी केला. दोन्ही देशांमधील नातं विश्वास आणि सद्भावनेवर आधारित आहे. संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शेती, संस्कृती, आरोग्य, शिक्षण आणि लोकांमधील संपर्क अशा विविध क्षेत्रांत ही भागीदारी वाढत आहे. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली.
मोदींनी सौदी अरेबियाला वर्ल्ड एक्स्पो २०३० आणि फिफा विश्वचषक २०३४ च्या यजमानपदासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी भारत-सौदी अरेबिया सामरिक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलं. २०२३ नंतरच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत दिनही नेत्यांनी घेतला. राजकीय, सुरक्षा, सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थ व गुंतवणूक या दोन मंत्रिस्तरीय समित्यांच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केलं. संरक्षण आणि पर्यटन व सांस्कृतिक सहकार्यासाठी दोन नव्या मंत्रिस्तरीय समित्या स्थापन झाल्यामुळे भागीदारी अधिक दृढ होईल. उच्चस्तरीय भेटींमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला असून बैठकीच्या शेवटी दोन्ही नेत्यांनी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे इतिवृत्त स्वाक्षरी केले.
सौदी अरेबियात राहणाऱ्या सुमारे २७ लाख भारतीयांच्या कल्याणासाठी सौदी सरकारच्या प्रयत्नांचं भारताने कौतुक केलं. २०२४ मधील हज यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दलही भारताने आभार मानले. भारतीय हज आणि उमरा यात्रेकरूंसाठी दोन्ही देशांमधील समन्वय उत्तम होता.
आर्थिक आणि व्यापारी सहकार्य
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक वाढत आहे. सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० च्या प्रगतीबद्दल भारताने अभिनंदन केलं. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाबद्दल सौदी अरेबियाने कौतुक केलं. दोन्ही देशांनी आपापल्या राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या कामगिरीवर दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केलं. ऊर्जा, पेट्रोकेमिकल, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, फिनटेक, डिजिटल पायाभूत सुविधा, दूरसंचार, औषध आणि उत्पादन क्षेत्रात सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढेल. या चर्चेत दोन रिफायनरी उभारण्यासाठी करार झाला असून करप्रणालीतील प्रगतीमुळे भविष्यातील सहकार्याला चालना मिळेल. द्विपक्षीय गुंतवणूक करार लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सौदीच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये भारत डेस्क सुरू झाल्याबद्दल भारताने आनंद व्यक्त केला.
ऊर्जा आणि पर्यावरण
जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील. कच्च्या तेलापासून एलपीजीपर्यंतच्या पुरवठ्यासाठी सहकार्य वाढेल. भारताच्या सामरिक साठा कार्यक्रमात सौदी अरेबिया सहभागी होईल. रिफायनिंग, पेट्रोकेमिकल, वीज, नवीकरणीय ऊर्जा आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी क्षेत्रात संयुक्त प्रकल्प होतील. ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा साठवण आणि ऊर्जा कार्यक्षमता यावरही सहकार्य होईल. सौदी अरेबियाच्या सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह आणि मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्हचं भारताने स्वागत केलं. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा गठबंधन, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गठबंधन आणि मिशन लाइफ यासारख्या भारताच्या पर्यावरणीय उपक्रमांचं सौदी अरेबियाने कौतुक केलं.
संरक्षण आणि सुरक्षा
संरक्षण सहकार्य हा सामरिक भागीदारीचा महत्त्वाचा भाग आहे. संरक्षण सहकार्यासाठी नवीन मंत्रिस्तरीय समिती स्थापन झाली. सदा तनसीक हा पहिला लष्करी सराव, अल मोहेद अल हिंदी नौदल सराव आणि उच्चस्तरीय भेटींमुळे संरक्षण सहकार्य वाढलं आहे. सायबर सुरक्षा, सागरी सीमा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि मादक पदार्थ तस्करीविरोधात सहकार्य वाढेल.
दहशतवादाचा निषेध
२२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा दोन्ही देशांनी तीव्र निषेध केला. दहशतवाद आणि हिंसक अतिरेकीपणा हे मानवतेसाठी मोठं आव्हान आहे. कोणत्याही कारणाने दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही. दहशतवादाला कोणता धर्म, वंश किंवा संस्कृतीशी जोडता येणार नाही. दहशतवादविरोधी सहकार्य आणि दहशतवादाला आर्थिक मदत रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील. सीमेपलीकडील दहशतवादाचा निषेध करताना दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रांचा वापर थांबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आरोग्य आणि तंत्रज्ञान
दोन्ही देशातील आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढत असून दोन्ही देशांमधील आरोग्य मंत्रालयांमध्ये सहकार्याचा करार झाला आहे. सौदी अरेबियाने नोव्हेंबर २०२४ मध्ये जेद्दाह येथे अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स परिषद यशस्वीपणे आयोजित केली. भारतीय औषधांच्या नोंदणीसाठी सौदी अरेबियाच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाने घेतलेल्या पावलांचं भारताने स्वागत केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टर यासारख्या नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढेल.
सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य
सांस्कृतिक सहकार्य वाढत आहे. वारसा, चित्रपट, साहित्य, प्रदर्शन आणि दृश्यकला यात दोन्ही देश सक्रिय आहेत. पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी नवीन मंत्रिस्तरीय समिती स्थापन झाली असून पर्यटन, माध्यम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही सहकार्य वाढेल. शिवाय या दोन्ही देशात शेती आणि अन्नसुरक्षा क्षेत्रात दीर्घकालीन करार होतील.
आंतरराष्ट्रीय सहकार्य
जी-20, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दोन्ही देशांचं सहकार्य वाढेल. यमनमधील राजकीय संकट सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना दोन्ही देशांचा पाठिंबा आहे. सौदी अरेबियाच्या यमनमधील मानवी मदतीचं भारताने कौतुक केलं. समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या समुद्र कायदा संहितेनुसार सहकार्य होईल.
या भेटीत खालील करार झाले:
-
अंतराळ क्षेत्रात शांततापूर्ण सहकार्यासाठी भारताच्या अंतराळ विभाग आणि सौदी अंतराळ संस्थेमध्ये करार.
-
आरोग्य क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयांमध्ये करार.
-
परदेशी पृष्ठभाग पार्सलसाठी भारताच्या टपाल विभाग आणि सौदी पोस्ट कॉर्पोरेशनमध्ये करार.
-
डोपिंगविरोधी सहकार्यासाठी भारताच्या राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्था आणि सौदी अरेबिया डोपिंगविरोधी समितीमध्ये करार.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter