म्यानमारच्या मदतीसाठी भारताचे 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
भारताने म्यानमारला मानवीय मदत पुरवली.
भारताने म्यानमारला मानवीय मदत पुरवली.

 

म्यानमारमध्ये काल ७.७ स्केलचा भूकंप झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच शेकडो लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. नुकतेच भारताने म्यानमारला नुकसानातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने म्यानमारच्या लोकांना मानवीय मदत पोहोचवण्यासाठी 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू केले आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिली. 

'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत भारताने आपली 'नेबरहुड फर्स्ट' आणि 'अॅक्ट ईस्ट' धोरणे लक्षात घेऊन तंबू, ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्स, अन्नाचे पॅकेट्स, स्वच्छता किट्स, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह १५ टनाची पहिली मदत म्यानमारमधील यांगून येथे पोहोचवली आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, "ऑपरेशन ब्रह्मा सुरू झाले आहे. भारताकडून मानवीय मदतीची पहिली खेप म्यानमारच्या यांगून विमानतळावर पोहोचली आहे." 

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सागाइंग शहराच्या वायव्येस होता. म्यानमारच्या सैनिकी सरकारने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत ६९४ जणांचा मृत्यू झाला असून १,६७० जण जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे म्यानमारसह शेजारील थायलंडमध्येही मोठी हानी झाली आहे.

हा भूकंप शुक्रवारी दुपारी १२ :५०  वाजता झाला. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, हा भूकंप जमिनीपासून फक्त १० किलोमीटर खोलीवर झाला. यामुळे त्याचा परिणाम अधिक गंभीर झाला. या भूकंपानंतर ६.७  तीव्रतेचा मोठा आफ्टरशॉक आणि अनेक छोटे धक्केही जाणवले. सागाइंग परिसरातून सुरू झालेल्या या भूकंपाचे धक्के थायलंड, भारत, चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेशपर्यंत जाणवले.

म्यानमारच्या सैनिकी सरकारचे प्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी सांगितलं की, “मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण देशभरात झालेल्या नुकसानाची व्याप्ती खूप मोठी आहे. मंडाले शहरात अनेक इमारती कोसळल्या, रस्ते तुटले आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. सागाइंगमधील १०० वर्षांहून जुना अवा पूलही इरावती नदीत कोसळला. रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या इतकी वाढली की, वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत.” 

थायलंडमधील परिस्थिती
थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही  या भूकंपाची तीव्रता जाणवली. या भूकंपामुळे बँकॉकमध्ये एका ३० मजली इमारतीचं बांधकाम सुरू असताना ती कोसळली. यामध्ये काही कामगार अडकले. थायलंडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी सांगितलं की, ‘या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला आणि ८१ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.’ बँकॉकमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे. 

म्यानमार हा इंडिया प्लेट आणि युरेशिया प्लेटच्या सीमेवर वसलेला देश आहे. यामुळे तो भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील भूकंप तज्ज्ञ जोआना फॉरे वॉकर यांनी सांगितलं, "म्यानमारमधून उत्तर-दक्षिण दिशेने जाणारी प्लेट सीमा देशाला विभागते. या दोन प्लेट्स एकमेकांविरुद्ध सरकतात. यामुळे 'स्ट्राइक स्लिप' प्रकारचे भूकंप होतात." सागाइंग फॉल्टमुळे यापूर्वीही अनेक भूकंप झाले असले, तरी ७  ते ८ तीव्रतेचे भूकंप येथे दुर्मीळ मानले जातात.

म्यानमारमधील मर्यादित वैद्यकीय सुविधांमुळे या आपत्तीचं व्यवस्थापन करणं कठीण बनलं आहे. या परिस्थितीतून म्यानमारला बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत आणि स्थानिक बचाव पथकं अहोरात्र काम करत आहेत. शुक्रवारी रात्री ११ :५६ ला म्यानमारमध्ये पुन्हा ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या (NCS) माहितीनुसार हा भूकंपही 10 किलोमीटर खोलीवर झाला. यामुळे आणखी आफ्टरशॉकची भीती व्यक्त केली जात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter