विदेशातील शीख फुटीरतावाद्यांवर हल्ले घडवून आणल्याबद्दल भारताच्या 'रॉ' या गुप्तचर संस्थेवर निर्बंध लागू करण्याची शिफारस करणाऱ्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाला (यूएससीआयआरएफ) भारताने फटकारले आहे. पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असलेली निरीक्षणे प्रसिद्ध करण्याचे धोरण अमेरिकेच्या या आयोगाने कायम ठेवले असून 'चिंताजनक संस्था' म्हणून त्याला घोषित करावे, अशी मागणीही भारताने केली आहे.
अमेरिका आणि इतर देशांमधील शीख फुटीरतावाद्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये रिसर्च अँड अॅनालिसिस चा (रॉ) सहभाग असल्याने या संस्थेवर निर्बंध लागू करावेत, अशी शिफारस अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने आपल्या वार्षिक अहवालात केली आहे. तसेच, भारतात अल्पसंख्याकांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे आणि २०२४ मध्ये या समुदायांवरील हल्ल्यांत वाढ झाली असल्याचाही आरोप अहवालात करण्यात आला आहे.
धार्मिक स्वातंत्र्याचा भंग होत असल्याबद्दल भारताला 'विशेष चिंताजनक देश' म्हणून घोषित करावे, अशीही शिफारस आयोगाने केली आहे. या अहवालावर तीव्र आक्षेप घेत परराष्ट्र मंत्रालयाने या अमेरिकेच्या या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाला आयोगाला फटकारले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "अमेरिकेच्या धार्मिक आयोगाच्या ताज्या अहवालात त्यांनी राजकीय हेतूंनी प्रेरित निरीक्षणे नोंदविण्याचा प्रकार कायम ठेवला आहे."
चुकीचे चित्र उभे केले
"काही ठराविक घटनांच्या आधारावर चुकीचे चित्र उभे करण्याचा व भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिकतेवर शंका उपस्थित करण्याचा आयोगाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याबाबत असलेल्या काळजीपेक्षा ठराविक अजेंडा राबविण्यावरच त्यांचा भर असल्याचे स्पष्ट आहे. भारतात सर्व जाती-धर्माचे मिळून एक अब्ज ४० कोटी लोक मिळून मिसळून राहतात. अमेरिकेचा धार्मिक आयोग हे वास्तव समजून घेईल, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही," असे जयस्वाल म्हणाले.
भारतावर सातत्याने आरोप
अमेरिका आणि कॅनडामधील खलिस्तानवाद्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या २०२३ मध्ये झालेल्या आरोपानंतर भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. खलिस्तानवादी गुरपतवंतसिंग पन्नून याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी गुप्तचर अधिकारी विकास यादव यांच्यावर अमेरिकेने आरोप केल्यानंतर तणावात वाढ झाली होती. खलिस्तानवादी हे सुरक्षेला धोका असल्याचे भारताचे म्हणणे असले तरी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांत सहभाग नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेतील धार्मिक आयोगाने मागील काही अहवालांमध्ये भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याचा आरोप केला आहे. भारत सरकारने मात्र, हा आयोग एकांगी आणि राजकीय हेतूंनी प्रेरित निरीक्षणे नोंदवित असल्याची टीका भारताने केली आहे.