भारताने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मोठ्या कराराला मान्यता दिली आहे. या करारांतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सकडून २२ सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळणार आहेत. ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या करारावर लवकरच स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
या करारामुळे भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांच्या क्षमतांमध्ये वाढ होण्यासही मदत होईल. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ३७ ते ६५ महिन्यांत डसॉल्ट एव्हिएशनकडून बनवण्यात येणारी २६ राफेल-एम विमाने भारताला मिळण्याची अपेक्षा आहे, असे एएनआयने नमूद केले आहे.
खरेदी करण्यात येणाऱ्या २६ राफेल विमानांपैकी २२ सिंगल-सीटर विमाने असतील तर चार विमानांमध्ये दोन वैमानिक बसण्याची क्षमता असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने प्रामुख्याने स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात केली जातील. यामुळे भारताला हिंद महासागर क्षेत्रातील चिनी हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल.
करारानुसार, नौदलाला २६ राफेल विमानांसह देशातील काही भागांत प्रशिक्षण, देखभाल, लॉजिस्टिक्स सपोर्ट आणि उत्पादनाचे मोठे पॅकेज देखील मिळणार आहे. याचा अर्थ केवळ विमानेच नाही तर त्यांना उडवण्याची आणि हाताळण्यासाठीही फ्रान्सकडून सहकार्य करण्यात येणार आहे. या करारात केवळ विमानांचाच समावेश नाही तर भारतीय हवाई दलासाठी ग्राउंड बेस्ड सॉफ्टवेअर आणि सिस्टम अपग्रेडचाही समावेश आहे. राफेल मरीन चालवण्यासाठी नौदलाला आयएनएस विक्रांतवर काही विशेष उपकरणे बसवावी लागतील जेणेकरून त्यांच्या कामगिरीत कोणतीही तडजोड होणार नाही.नवीन राफेल सागरी लढाऊ विमान खरेदी करारामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे.