एका हिंदू मंदिरात भाविकांवर झालेल्या हल्ल्यावरून कॅनडात प्रचंड गदारोळ सुरू आहे. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांच्या हिंसाचाराबद्दल संताप व्यक्त केलाय. कॅनडात अतिरेक्यांना मोकळे सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही लोक मंदिराच्या आवारात घुसून तिथं उपस्थित असलेल्या लोकांवर हल्ला करत आहेत. खासदार आर्य यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी आज लक्ष्मणरेषा ओलांडलीये. बॅम्टनमधील हिंदू सभा मंदिर संकुलात भारतीय-कॅनडियन भाविकांवर खलिस्तानींनी केलेल्या हल्ल्याने कॅनडात खलिस्तानी अतिरेकी किती धोकादायक आहेत हे दाखवून दिलंय.'
त्यांनी पुढं लिहिलंय की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलिस्तानींना कॅनडामध्ये मोकळे सोडले जात आहे. मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आलोय की, आपल्या समुदायाच्या सुरक्षेसाठी हिंदू-कॅनेडियन लोकांना त्यांच्या हक्कांसाठी उभं राहून लढावे लागेल आणि राजकारण्यांना जबाबदार धरावे लागेल.' याआधी जुलैमध्येही खासदारांनी समाजाविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे, भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण असताना ही घटना घडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिलंय, 'बॅम्टनमधील हिंदू सभा मंदिरात आजची हिंसाचाराची घटना मान्य नाही. प्रत्येक कॅनेडियनला सुरक्षित वातावरणात त्याच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि या घटनेची चौकशी करण्यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल पोलिसांचा मी आभारी आहे, असं त्यांनी लिहिलंय.