'इस्लामोफोबिया'(इस्लामबद्दलचा भयगंड) दूर करण्यासाठी व्हाइट हाउसच्या वतीने पहिल्यांदाच राष्ट्रीय धोरण आखण्यात आले आहे. मुस्लिमांबाबतचा द्वेष, त्यांच्याविरोधात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना आणि त्यांच्याबाबत घडणारा भेदभाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय प्रशासनाकडून तब्बल शंभरहून अधिक पर्याय असलेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून या प्रस्तावावर अनेक अधिकारी काम करत होते, असे बायडेन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, बायडेन यांच्या प्रशासनाचा कार्यकाळ पूर्ण व्हायला अवघे पाच आठवडे राहिले असतानाच हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, त्यामुळे याची अंमलबजावणी अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यावरच होऊ शकते. मात्र ट्रम्प यांचे प्रशासन हा अहवाल स्वीकारेल का? अस असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. "मागील वर्षभरात अमेरिकेतील मुस्लिम आणि अरबी समुदायातील नागरिकांविरोधातील द्वेष वाढला असून त्या पार्श्वभूमीवर हे धोरण आवश्यक आहे," असे मत बायडेन प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आले. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 'वादी अल्पायोमीन' या पॅलेस्टिनी वंशाच्या सहा वर्षाच्या बालकाची हत्या करण्यात आल्याचे उदाहरणही यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.