इस्लामी कालगणनेनुसार नववा महिना म्हणजे रमजान. जगभरात रमजानच्या पवित्र महिन्यास सुरुवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिमांमध्ये उपवास करण्याची प्रथा आहे, ज्याला रोजा असे म्हणतात. इफ्तारने रमजानच्या रोजाची सांगता होत असते. त्यामुळे या महिन्यात जागोजागी इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले जाते. १००० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लंडनच्या विंडसर कॅसल या ऐतिहासिक किल्ल्यात इफ्तारच्या भव्य मेजवणीचे आयोजन करण्यात आले होते.
थेम्स नदीच्या दक्षिण किनार्यालगत असलेला विंडसर कॅसल किल्ला हे १२व्या शतकापासून राजघराण्याचे निवासस्थान आहे. या ऐतिहासिक किल्ल्यात इफ्तारनिमित्त शहरातील विविध भागातील शेकडो मान्यवर उपस्थित होते. किल्ल्याच्या सेंट जॉर्ज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
इफ्तारचा हा कार्यक्रम रमजान टेंट प्रोजेक्ट (RTP) आणि रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आला होता. रमजान टेंट प्रोजेक्टचे संस्थापक आणि सीईओ ओमार सल्हा यांनी कार्यक्रमाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले,“या ऐतिहासिक विंडसर कॅसल किल्ल्यात रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास सोडणे हा अत्यंत भावनिक आणि भारावून टाकणारा क्षण आहे. ही इमारत जगातील सर्वात प्रसिद्ध आणि शाही इमारतींपैकी एक आहे. याठिकाणी सर्व धर्माच्या लोकांसोबत एकत्र येत इफ्तार साजरा करणे हा ऐतिहासिक प्रसंग आहे.”
ओमार सल्हा यांनी या प्रसंगाचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “विंडसर किल्ल्यात रमजान साजरा करणे हे ब्रिटनच्या समृद्ध संस्कृतीची आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. ब्रिटिश मुस्लिम समुदायासोबत सतत राहिल्याबद्दल आणि धार्मिक सौहार्द टिकवून ठेवल्याबद्दल आम्ही महामहिम राजाचे आभारी आहोत.”
रमजान टेंट प्रोजेक्टद्वारे ‘ओपन इफ्तार’ नावाने दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येऊन यामध्ये सहभाग घ्यावा हा या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश असतो. या महोत्सवासाठी दरवर्षी लाखो लोक एकत्र येत असतात. ब्रिटनमधील अनेक प्रमुख ठिकाणी दरवर्षी इफ्तार मेळावे आयोजित होतात. त्यामध्ये प्रत्येक समुदायातील लोक सहभाग घेतात.
रॉयल कलेक्शन ट्रस्टचे व्हिजिटर ऑपरेशन्स डायरेक्टर सायमन मॅपल्स यांनी या सोहळ्याप्रसंगी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आम्ही गेल्या वर्षी किल्ल्याच्या लर्निंग सेंटरमध्ये पहिला इफ्तार कार्यक्रम छोटेखानी आयोजित केला होता. यंदा आम्हाला रमजान टेंट प्रोजेक्टसोबत एकत्र उपक्रम राबवताना अत्यंत आनंद होतो. देशात धार्मिक विविधता, एकता आणि सद्भाव नांदावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले. या इफ्तार मेजवणीचा हा कार्यक्रम सेंट जॉर्ज हॉलमध्ये आयोजित केला होता. जवळपास ४००हून अधिक मान्यवर आणि रोजेदारांना या ऐतिहासिक वास्तूत इफ्तार साजरे करता आले याचा आम्हाला आनंद होतोय.”
दरवर्षी या महोत्सवात ‘फास्ट अ डे’ हा उपक्रम राबवला जातो. यंदाही या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाद्वारे व्यवसाय, कॉर्पोरेट्स, एक्झिक्युटिव्ह, कर्मचारी आणि व्यावसायिकांच्या समूहाला त्यांच्या शहरात छोटेखानी का होईना पण इफ्तारच्या मेजवणीचे आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला. यासोबतच रमजानबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या पवित्र महिन्यात एक तरी दिवस उपवासात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले गेले.
ब्रिटनच्या संसदीय कार्यक्रमात इफ्तार साजरा
पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी संसदीय कार्यक्रमात इफ्तार केला. या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन ‘ऑल-पार्टी पार्लमेंटरी ग्रुप ऑन ब्रिटिश मुस्लिम्स’ (APPG) तर्फे करण्यात आले होते.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान स्टार्मर यांनी ब्रिटिश मुस्लिमांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी गाझातील संघर्षामुळे मुस्लिम समुदायाला होणाऱ्या वेदनेवर चर्चा केली आणि त्याचा परिणाम ब्रिटनमधील समुदायांवर कशाप्रकारे होतो यावर आपले विचार मांडले.
याविषयी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “गाझामधील संघर्षामुळे मुस्लिम समुदायाला ज्या वेदना होत आहे, त्याचा अनुभव आम्ही इथे ब्रिटनमधून देखील घेत आहोत. हा एक कठीण काळ आहे, परंतु आपण एकत्र राहून आणि एकमेकांना आधार देऊन हा आव्हानात्मक काळ पार पाडू.”