प्रज्ञा शिंदे,
ढाका: शेख हसीना यांच्या सरकारचा राजीनामा आणि त्यानंतरच्या अराजकतेच्या काळात, बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर कट्टरवाद्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर ढाक्याचे प्राचीन ढाकेश्वरी मंदिर, जे हिंदू समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली होती. मात्र, या संकटकाळात हिंदू-मुस्लिम समुदाय एकत्र आले आणि मंदिराच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे राहिले.
ढाकेश्वरी मंदिराच्या रक्षणासाठी बांगलादेशातील हिंदू-मुस्लीम आले एकत्र
ढाकेश्वरी मंदिराचे पुजारी असीम मैत्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा 5 ऑगस्टला हिंसाचार होत होता आणि शेख हसीना यांनी राजीनामा दिला, त्यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव होता. पण या मंदिराचे रक्षण करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकत्र आले आणि कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. त्यामुळे मंदिरात अखंड पूजा सुरू असून सामान्य दिवसांप्रमाणेच देवीला नैवेद्यही दिला जातो. "
हे मंदिर आहे सलोख्याच प्रतिक
ढाकेश्वरी मंदिर हे बांगलादेशातील एक प्रमुख शक्तीपीठ आहे. मैत्रोने सांगितले की, गेल्या १५वर्षांपासून ते या मंदिरात पुजारी आहेत. हे मंदिर जातीय सलोख्याचे प्रतिक आहे. मंदिराभोवती अनेक मशिदी आहेत. ढाकेश्वरी मंदिरात मशिदींमध्ये मगरीबच्या नमाजानंतर अर्धा तास म्हणजे साधारण सात वाजता आरती होते. या मंदिरात हिंदूंसह मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचे लोकही प्रार्थना करण्यासाठी येतात. हे अस मंदिर आहे, जिथे श्रद्धा आणि मानवीय एकात्मतेचं जिवंत दर्शन घडतं. ढाकेश्वरी मंदिर म्हणजे धर्मांच्या सीमा ओलांडून उभं असलेलं सामूहिक श्रद्धेचं प्रतीक आहे. मैत्रो यांनी सांगितले की, "आई ही सर्व मानवांची आई असते. येथे विविध धर्माचे लोक शांती आणि समृद्धीच्या आशीर्वादासाठी येतात."
परिस्थिती येत आहे पूर्वपदावर
बांगलादेशात जेव्हा हिंसाचार झाला, तेव्हा भीतीमुळे फार कमी लोक मंदिरात येऊ शकत होते, परंतु आता परिस्थिती सामान्य होत असल्याने लोक पुन्हा मंदिरात येत आहेत. पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनीही ढाकेश्वरी मंदिरात जाऊन येथील हिंदू समाजातील लोकांची भेट घेतली होती. मोहम्मद युनूस यांनी अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षेचे आश्वासन दिले. आता परिस्थिती सामान्य होत असल्याचे पुजारी म्हणाले. येथे दरवर्षी दुर्गापूजा आणि इतर सण साजरे केले जातात. आता २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार आसिफ नजरुल आणि माहिती सल्लागार नाहिद इस्लाम हे देखील ढाकेश्वरी मंदिरातील जन्माष्टमी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे