इस्राईलच्या हल्ल्यात हमास नेता राव्ही मुश्‍ताहा ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 16 h ago
हमास सरकारचा प्रमुख राव्ही मुश्‍ताहा
हमास सरकारचा प्रमुख राव्ही मुश्‍ताहा

 

जेरूसलेम : गाझा पट्टीवरच्या तीन महिन्यापूर्वीच्या हवाई हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख राव्ही मुश्‍ताहा आणि त्याचे दोन सहकारी अधिकारी मारले गेल्याचे आज इस्राईल सरकारकडून जाहीर करण्यात आले. राव्ही मुश्‍ताहा हा हमासचा म्होरक्या याह्या सिनवरचा उजवा हात मानला जात होता.

उत्तर गाझातील हवाई हल्ल्यात एका भूमिगत भागाला लक्ष्य करण्यात आले आणि त्यात मुश्‍ताहासमवेत कमांडर अल सीराज आणि समी औदेह यांचा मृत्यू झाला, असे इस्राईलने म्हटले आहे. यासंदर्भात हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इस्राईल सरकारच्या मते, या तिन्ही कमांडरनी एका सुरक्षित बंकरमध्ये आश्रय घेतला हेाता आणि ते ठिकाण नियंत्रक कक्षच्या रूपाने काम करणारे होते. या ठिकाणी बराच काळ राहण्याची सुविधा उपलब्ध होती. बंकरचे व्यवस्थापन हमासच्या सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात होते आणि ते मुश्‍ताहाच्या नेतृत्वाखालील हमास प्रमुखांना भेटण्यासाठी ते एक ठिकाण होते.

या बंकरवरील हल्ल्याचा आणि दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्ताला हमासने अद्याप दुजोरा दिलेला नाही आणि मुश्‍ताहा याच्या मृत्युबाबतही निवेदन जारी केले नाही. कारण या वृत्ताने दहशतवादी संघटनेचे मनोधैर्य कमी होऊ शकते, अशी भीती हमासला वाटत असल्याचे इस्राईलने म्हटले आहे.

दरम्यान, दक्षिण गाझात काल इस्राईलने भीषण हल्ला केला असून हा हल्ला इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर होते, असे इस्राईलने म्हटले आहे. इस्राईल सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यात किमान ५१ जण मारले गेले आहेत.

मृतांत महिला आणि मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे लेबनॉनवर इस्राईलकडून हल्ले सुरूच आहेत. इस्राईलच्या हल्ल्यांत गेल्या चोवीस तासात किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या मते, बैरूत येथील बाचोरा भागात आज सकाळी संसदेजवळ एका इमारतीला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे मालमत्तेची बरीच हानी झाली.