हमासने तीन ओलिसांची 'अशी' केली मुक्तता

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 5 h ago
अखेर सुटकेचा नि:श्वास
अखेर सुटकेचा नि:श्वास

 

गाझामधील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर अखेर शांततेचा किरण दिसू लागला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार रविवारी लागू झाला असून, तब्बल १५ महिन्यांनंतर गाझामध्ये स्थिरतेची आशा निर्माण झाली आहे. या युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांसाठी संघर्ष थांबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हमासच्या ताब्यातील काही ओलीसांची आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार आहे.  

ओलीसांची सुटका आणि युद्धविरामाचा अंमल 
स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता युद्धविराम लागू होणार होता, मात्र हमासने अखेरच्या क्षणी सुटका करावयाच्या तीन ओलीसांची नावे जाहीर न केल्याने कराराच्या अंमलबजावणीला तीन तास उशीर झाला. अखेर दोन तासांच्या विलंबानंतर नावे घोषित करण्यात आली आणि युद्धविराम सकाळी ११.१५ वाजता प्रत्यक्षात लागू झाला.  

युद्धविरामाच्या सुरूवातीच्या काही तासांत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान २६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गाझाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतरचा संघर्ष  
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे १,२०० इस्रायली नागरिक ठार झाले आणि २५० जणांचे अपहरण करून ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून इस्रायलने गाझावर व्यापक हवाई आणि जमिनीवरील कारवाई सुरू केली.  

या संघर्षात गाझामधील प्रमुख शहरे जसे की राफा, खान युनिस आणि देर अल-बलाह बेचिराख झाली. युद्धामुळे २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास २० लाख पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये ४६,९१३ पॅलेस्टिनी ठार आणि १,१०,७५० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिली.  

पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण 
युद्धविरामाच्या घोषणेनंतर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांनी जल्लोष केला. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात लोक आनंद साजरा करताना दिसले. अनेक ठिकाणी हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.  

युद्धविरामाच्या करारातील महत्त्वाचे मुद्दे 
- पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांसाठी युद्ध थांबवण्यात येणार आहे.  
- गाझामधून ३३ ओलीसांची सुटका केली जाणार आहे. त्याच्या बदल्यात शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात येईल.  
- गाझामधील बफर क्षेत्रातून इस्रायली सैन्य माघार घेणार आहे.  
- विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना पुन्हा त्यांच्या प्रदेशात परतण्याची संधी मिळेल.  
- युद्धग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत पोहोचवली जाईल.  

शांततेकडे एक पाऊल? 
युद्धविराम झाल्यामुळे तणाव काहीसा निवळला असला तरी इस्रायल-हमास संघर्ष पूर्णतः थांबेल का, याबाबत निश्चितता नाही. दोन्ही बाजूंनी दीर्घकालीन शांततेसाठी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.