इस्त्राईल आणि हमास यांच्यात मागील १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे या प्रक्रियेतील मध्यस्थ असलेल्या कतारने सांगितले आहे. काही महत्त्वाच्या मुद्यांवर दोन्ही बाजूंची सहमती बाकी असली तरी हमासने युद्धबंदीचा मसुदा मान्य केला असल्याचे कतारने सांगितले.
हमास आणि इस्त्राईलमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यास गाझा पट्टीतील हल्ले थांबून काही अपहृतांचीही सुटका होऊ शकते. या दोन्ही बाजूंमध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने वाटाघाटी सुरू असून कतार, इजिप्त आणि अमेरिका हे मध्यस्थी करत आहेत. हमासने शांतता कराराचा मसुदा स्वीकारला असल्याचे कतारच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. शांततेच्या या योजनेला इस्त्राईलच्या संसदेची मंजुरी आवश्यक आहे.
हल्ल्यात १८ ठार
जेरुसलेम : इस्त्राईलने गाझा पट्टीतील हल्ले तीव्र करताना सोमवारी रात्री अनेक ठिकाणी हल्ले केले. या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाला, तर तीसहून अधिक जण जखमी झाले. इस्त्राईलच्या विमानांनी आज देर अल बाला या शहरात दोन ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात चार बालकांसह दोन महिलांचा मृत्यू झाला, एक बालक एका महिन्याचे होते, तर एक महिला गर्भवती होती. याशिवाय, खान युनिस शहरावरही दोन हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये बारा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, येमेनमधील हौथी बंडखोरांनी आज इस्त्राईलला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले. हौथींनी डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्त्राईलच्या संरक्षण दलाने केला आहे.