'यामुळे' थांबले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू असलेल्या गाझा युद्धाला पूर्णविराम मिळाला असून १९ जानेवारी रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार होणार आहे. यावेळी लढाई थांबवण्यासाठी आणि ओलिस व कैद्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी युद्धविराम करार केला जाणार आहे.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी या युद्धाला सुरुवात झाली. हमासने इजराइलवर केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झाले. या हल्ल्यात बाराशेहून अधिक लोक मारले गेले होते. तर अडीचशे लोकांना हमासने ओलिस ठेवले होते. त्यानंतर या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

युद्धा दरम्यान आतापर्यंत गाजा पट्टीतील ४६,००० लोक मारले गेले असल्याचे म्हटले जात आहेत. तर २.३ दशलक्ष लोकसंख्येचे या युद्धामुळे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतारच्या पुढाकाराने अनेक महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. त्याला अखेर बुधवारी यश आले. मात्र, यासाठीचा करार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहीतीनुसार, इस्रायली फौजा गाझामधून टप्प्याटप्प्याने माघार घेतील. याच बरोबर पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल. या कराराला मान्यता मिळाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे म्हटले जात आहे.

इस्रायल-हमास युद्धविरामाचे भारताकडून स्वागत 
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इस्रायल-हमास युद्धविराम कराराचे स्वागत केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "आम्ही ओलिसांच्या सुटकेसाठी आणि गाझामध्ये युद्धविराम करण्याच्या कराराच्या घोषणेचे स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की यामुळे गाझातील लोकांना मानवतावादी सहाय्य आणि शाश्वती मिळेल. आम्ही सातत्याने सर्व ओलीसांची सुटका, युद्धविराम आणि संवादाच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले आहे," असे एमईएने एका निवेदनात म्हटले आहे.